प्राधिकरणाच्या सावळ्या गोंधळात हरवताहेत बिलांच्या तक्रारी

खातेदारांना हेलपाटे; कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे, वादावादी आणि कार्यालयीन वेळेत झोपही

सातारा  – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बिलांचा सावळा गोंधळ संपलेला नाही. कराडच्या ठेकेदाराने बिल वितरणासाठी यंत्रणा नेमल्याचा दावा केला तरी शहराच्या पूर्व भाग संभाजी नगर, विलासपूर, शाहूपुरी या भागातील नागरिकांना अद्याप बिले मिळाली नसल्याची ओरड कायम आहे. प्राधिकरणाच्या दुसऱ्या मजल्यावर आधी वादावादी नंतर बिल कमी करण्यासाठी मध्यस्थी असल्या गलथान कारभारामुळे खातेदारांचा संताप पराकोटीला गेला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सातारा विभागात बिल वितरणाचा ठेकेदार व इतर आवश्‍यक सेवांचा ठेकेदार बदलताना वेळचे गणित फसल्याने नोव्हेंबर 2018 ते मार्च 2019 असे पाच महिन्याचे बिल खातेदारांना अदा करता आले नाही. तसेच 1 जून पासून प्राधिकरणाच्या पाण्याचे भाव वधारल्याने मूळ बिलांमध्ये दहा टक्के वाढ झाली. त्यामुळे आधीच बिल वितरणाची बोंबाबोंब त्यात खिशाला चाट त्यामुळे प्राधिकरणाच्या सतरा हजार खातेदारांचा संताप होऊ लागला आहे. त्यात प्राधिकरणाची कर्मचारी यंत्रणा ही उध्दट व सरकारी छापाची उत्तरे देणारी असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. मीटर चेक करावे लागेल, लमसम बिलाची रक्कम भरा, मीटर रिडिंग पुन्हा घ्यावे लागेल अशी निर्विकार उत्तरे दिली जात असल्याने नुसत्या रिकाम्या हेलपाट्यांनी नागरिक प्रचंड संतापले आहेत.

प्राधिकरणाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या झोपा
प्राधिकरणाच्या कार्यालयात “प्रभात’च्या प्रतिनिधीने भेट दिली असता कारभाराचा सावळा गोंधळ दिसून आला. बिलाच्या टेबलावरचे कर्मचारी बेपत्ता होते तर तक्रार घेऊन आलेल्या काही ग्राहकांना बसून राहावे लागले. लगतच्या एका टेबलवरची एक महिला कर्मचाऱ्याने चक्क खुर्चीला मान टेकून ताणून दिली होती. आता कामाच्या ठिकाणी झोपा आणि त्यांना खडसावणारे कोणी नसल्याचा सावळा गोंधळ नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला.

काही जणांनी शाखा अभियंत्याकडे जाऊन तक्रार केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांचा तेथील कारभारावर वचक नसल्याची तक्रार प्राधिकरणाचेच कर्मचारी करत आहेत. कराडच्या ठेकेदार एजन्सीकडून पाणी वितरणाची बिले देण्यात आल्याचा दावा गायकवाड यांनी केला. मात्र, शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत मात्र अद्यापपर्यंत बिले पोहचली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जर बिले पोहचलीच नाही तर ती गेली कोठे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. कराडच्या ठेकेदाराने हात झटकले आणि प्रशासनाने चुप्पी साधल्याने बिले न मिळण्याची ओरड संपलेली नाही.

मी करंजेतून रोज बिलाची पावती घेऊन येतो. मात्र, मीटर तपासणीसाठी माणूस पाठवतो असे सांगतात, प्रत्यक्षात मात्र कोणीच येत नाही. उतारवयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. माझ्या तक्रारीची कोणीच योग्य दखल घेत नाही.

– चंद्रकांत देवकर (करंजे)

बिलांच्या वाटपासाठी कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा नेमण्यात आलेली नाही. कोणालाही जादा बिल आकारण्यात आलेले नाही. ज्यांना बिलांच्या अडचणी आहेत त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

– संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.