चंदीगड: आपल्या प्रचार सभांना लोक गर्दीच करीत नाहींत अशा अफवा कॉंग्रेसचे चंदीगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार पवनकुमार बंसल हे पसरवत आहेत. त्यांनी या मतदार संघात माझ्या सभांपेक्षा जास्त गर्दी खेचून दाखवावी असे आव्हान याच मतदार संघातील भाजपच्या उमेदवार किरण खेर यांनी दिले आहे. बंसल यांना आव्हान देताना किरण खेर यांनी म्हटले आहे की शहरातील माझ्या कोणत्याही सभेला तुम्ही स्वता या आणि तेथे गर्दी किती असते ते तुम्ही स्वता तपासून पहा.
मीही तुमच्या सभेला एकटी येऊन तुमच्या सभेला किती गर्दी जमते ते पाहीन असे आव्हानही त्यांनी दिले आहे. बंसल हे आपल्याविषयी सातत्याने अशा अफवा पसरवत आहेत. कॉंग्रेस येथे स्वबळावर नाही तर पीआर एजन्सीच्या बळावर निवडणूक लढवत आहे असा आरोपही त्यांनी केला. चंदीगड मतदार संघात आपण गेल्या पाच वर्षांतील कामांच्या बळावर निश्चीत विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सन 2014 साली या मतदार संघात किरण खेर आणि बंसल यांच्यातच लढत झाली होती. त्यावेळी खेर यांनी बंसल यांचा 69 हजार 642 मतांनी पराभव केला होता. या मतदार संघात आम आदमी पक्षाचे हरमोहन धवन हेही निवडणूक लढवत आहेत.