पिंपरी – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल माध्यमावर केतकी चितळे हिने अत्यंत खालच्या दर्जाची पोस्ट केल्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. तसेच तिच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात चितळे विरोधात तक्रार केली असून तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात वाघेरे पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. या संदर्भात वाघेरे म्हणाले की, कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा कायम सन्मान राखणारे, तसेच अशा विविध क्षेत्रीतील मंडळींच्या मदतीला धावून जाणारे देशातील एकमेव नेते म्हणून शरद पवारांची ओळख आहे. परंतु, मागील काळात देशात आणि राज्यात विकृत मानसिकता घडविण्याचे काम सुरू आहे. धर्म, जातीय तेढ निर्माण करताना आपल्या विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे.
चितळे हा त्याचाच एक भाग आहे. तिने शरद पवार साहेबांबद्दल केलेली पोस्ट तिची विकृत मनोवृत्ती दर्शविणारी आहे. या प्रकाराबद्दल तिचा तीव्र निषेध करताना ही विकृत मानसिकता घडविणाऱ्यांचा निषेध करावा लागेल. केतकी चितळे हिच्या वक्तव्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. तसेच, समाजात अशा प्रकारे व्यक्तीव्देषापोटी खालच्या स्तरावर जाऊन टिका टिपण्णी करत असेल आणि त्याला प्रोत्साहन देत असेल, तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.