मुंबई – बॉलीवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे.
दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री ‘रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण होती. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शनिवारी कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली.
ज्यामध्ये, ‘रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतचा आपल्या फायद्यासाठी फक्त वापर केला. रियाने सुशांतला मानसिक त्रास दिला. तिने आपलं करियर सेट झाल्यावर सुशांतला सोडून दिलं’. असं कुंदन कुमार म्हणाले आहेत.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. याआधी बिहार येथे सलमान खान, आदित्य चोप्रा, करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.