दुर्घटनाग्रस्तांना शासन नियमानुसार लवकरच मदत

चंद्रकांत पाटील : ऐनवेळी सूचना मिळाल्याने तयारीस वेळ मिळाला नाही

पुणे – पुणे आणि परिसरात दोन दिवसांपूर्वी ढगफुटीच झाली आहे. हवामान खात्याकडून अगदी ऐनवेळी सूचना मिळाल्याने प्रशासनाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुर्घटनाग्रस्तांना शासन नियमानुसार लवकरच मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. विरोधकांनी अशा गंभीर परिस्थितीमध्ये केवळ आरोप न करता हातात हात घालून जनतेला मदत मिळावी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

दिल्लीमधील पक्षाची बैठक आटोपून पाटील यांनी पूरग्रस्त के. के. मार्केट, सहकारनगर, टांगेवाले कॉलनी, दत्तवाडी भागाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी दुपारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, मिसाळ, खासदार गिरीश बापट, आमदार दिलीप कांबळे, भीमराव जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी ढग फुटीची घटना घडल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भात सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. सह पालकमंत्री बाळा भेगडे आणि भाजपचे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मदतीसाठी शहरात होते. शहरात आणि ग्रामीण भागात प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि यंत्रणेच्या माध्यमातून चांगले काम केले. सकाळपासूनच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने साफसफाईचे काम हाती घेतले असून, आरोग्याच्या समस्या उद्‌भवणार नाहीत यासाठीही यंत्रणा कार्यरत झाली आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असेही पाटील यांनी नमूद केले.

सांगली, कोल्हापूरच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी नियमावली तयार केली आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने काही उपाययोजना मनात असूनही करता येत नाहीत. परंतु, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी आणि मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली आहे. संध्याकाळपर्यंत ही परवानगी मिळेल, अशी आशा आहे. टांगेवाले कॉलनीतील दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्‍तींच्या कुटुंबीयांना शनिवारपर्यंत मदतीचे धनादेश तातडीने दिले जातील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

“सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याची वेळ’
विरोधकांकडून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्‍न उपस्थित करणे हा त्यांचा राजकारणाचा भाग आहे, हे मी समजू शकतो. परंतु, परिस्थिती पाहता सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ आहे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही बारामतीबाबत कालच फोनवरून संपर्क साधून बारामतीतील पूरस्थिती आणि शासकीय यंत्रणेची विचारणा केली. पवार यांनीही यंत्रणा पोहोचल्याचे आणि काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी परिस्थितून बाहेर पडण्यासाठी सूचना जरूर कराव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.