पुणे – बलात्कार पीडितांना मदत व्हावी म्हणून राबविण्यात येत असलेल्या मनोधैर्य योजनेअंतर्गत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लॉकडाउनच्या काळात 12 लाख 30 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.
बलात्कार पीडीतांवर होणाऱ्या अत्यारानंतर त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून मनोधैर्य योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई देण्यात येते. या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्राधिकरणाकडे आलेल्या अर्जांची छाननी आणि नुकसानभरपाईची रक्कम देण्याची पूर्तता लॉकडाउनच्या काळातही तातडीने करण्यात आली, असल्याचे भागवत यांनी सांगितले.
नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आलेल्यांमध्ये चार महिला, अनैसर्गिक अत्याचार प्रकरणात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. बलात्कार प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बलात्कार पीडीतांनी प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास त्यांना मनोधैर्य योजनेअंतर्गत 25 टक्के रक्कम देण्यात येते. त्यानंतर संबंधित दाव्याची कोर्टात सुनावणी झाल्यानंतर उर्वरित 75 टक्के रक्कम देण्यात येते. फिर्यादीने सुनावणीत साक्ष फिरवली तर त्याला ही रक्कम दिली जात नाही, तसेच दंडही होऊ शकतो.