-->

अतिवृष्टी, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या देहूतील शेतकऱ्यांना भरपाई

  • अतिवृष्टीने 180 आणि चक्रीवादळामुळे आठ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

देहूगाव – राज्यात गतवर्षी जून ते ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे देहूतील 180 शेतकरी लाभार्थ्यांना व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या 6 लाभार्थ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेचे धनादेश वाटप महसूल विभागाच्या वतीने करण्याचे काम सुरू असून, काही लाभार्थ्यांना वाटपही करण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी शेखर शिंदे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, देहूगावचे गावकामगार तलाठी अतुल गीते, कोतवाल संभाजी मुसूडगे आदी यावेळी उपस्थित होते.

देहूगाव व परिसरात जून ते ऑक्‍टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार तात्काळ पंचनामे, अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये देहूगावमध्ये 53 शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात, भाजीपाला व फळबागांचे नुकसान झाले होते. त्यांना 1 लाख 12 हजार 70 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली.
विठ्ठलनगर येथील 106 शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात व भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई म्हणून 2 लाख 27 हजार 37 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. माळीनगर भागातील 21 शेतकऱ्यांना सोयाबीन, भात, भाजीपाला या पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई म्हणून 39 हजार 890 रुपयांचे असे एकूण 3 लाख 78 हजार 997 रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

दरम्यान, चक्रीवादळात देहूगावसह विठ्ठलनगर व माळीनगर परिसरातील सहा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. देहूगाव मधील 4 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये असे 40 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. विठ्ठलनगर व माळीनगर येथील प्रत्येकी एक घराचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते. त्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली. अशी एकूण 70 हजार रुपयांची मदत चक्रीवादळात नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.