साडेसोळा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

तहसील कार्यालयाकडे निधी : 5 कोटी 31 लाख रुपयांची मदत मिळणार

कामशेत – गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ऑक्‍टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये “क्‍यार’ चक्रीवादळाचा फटका शेतपिकाला बसला. शेत पिकांच्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना विशेष दराने मदत करण्याच्या शासन निर्णयानुसार मावळातील 16 हजार 419 शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीसाठी मदत मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्‍यातील 2 हजार 98 शेतकऱ्यांच्या 883.70 हेक्‍टर क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाले होते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या भातपिकाच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रतीहेक्‍टरी कमीत कमी एक हजार ते 20 हजार 400 रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यसाठी मावळ तहसीदार यांच्याकडे 99 लाख 9 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळ व अवेळी पावसामुळे कापणीस आलेल्या 5432.22 हेक्‍टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले होते. या काळात नुकसान झालेल्या 14 हजार 321 शेतकऱ्याना प्रतीहेक्‍टर एक हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करण्यासाठी मावळ तहसीलदार यांच्याकडे 4 कोटी 32 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

गतवर्षी ऑगस्ट आणि ऑक्‍टोंबर-नोव्हेंबर दोन्ही मिळून एकूण 16 हजार 419 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मावळ तहसीलदार कार्यालयास प्राप्त झाला आहे.

तसेच कृषी विभाग व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पिक पंचनाम्यांच्या आधारे पीक नुकसान भरपाईची रक्‍कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून, येत्या काही दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रक्‍कम जमा होणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

गतवर्षी ऑगस्ट आणि ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. अशा सर्व शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाईची रक्‍कम जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.