रंगांच्या दुनियेतील सदाबहार कंपनी
मार्केट कॅपिटल (कोटी रुपये) – 47,133.78 (शुक्रवारचा बंद)
पी/ई 86.37
इंडस्ट्री पी/ई 80.52
फेस व्हॅल्यू रू. 1.00
लाभांश190.00 टक्के
शुक्रवारचा बंद485.40 रु.
लुई बर्जर या रंग-रसायन तज्ज्ञाने ब्रिटनमध्ये 1760 मध्ये बर्जर पेन्टस् या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. भारतात या कंपनीचे कामकाज 1923 मध्ये सुरु झाले. हॅडफिल्डस् इंडिया लिमिटेड म्हणून 88 वर्षांपूर्वी कोलकत्यातील हावडा येथे कंपनीचा पहिला कारखाना सुरु झाला. त्यावेळी दोन एकर जागेतील कारखान्यात मिक्स्ड् स्टिफ पेन्टस्, वॉरनिश, डिस्टेंपरचे उत्पादन केले जात असे. आज ही देशातील पेंटच्या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असून गेल्या काही वर्षात प्रत्येक तिमाहीतील कामगिरीत कंपनीने सातत्याने चढता आलेख ठेवलेला आहे.
1947 च्या दरम्यान ब्रिटनमधील ब्रिटिश पेन्टस् (होल्डिंग्ज) लिमिटेडने हॅडफिल्डचा ताबा घेतला आणि तिचे नाव ब्रिटिश पेन्टस् इंडिया लिमिटेड असे झाले. अलेक्झांडर व्हेरनॉन निब्लेट हे कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्यानंतर 1962 मध्ये अल्फ्रेड गुडविन यांच्याकडे ही जबाबदारी आली.1965 मध्ये ब्रिटीश पेन्टस् (होल्डिंग्ज) लिमिटेड या पेरेन्ट कंपनीचा ताबा अमेरिकेतील क्लिन्सी कॉर्पोरेशनकडे गेला आणि कंपनीचे नियंत्रण क्लिन्सी कॉर्पोरेशनची उपकंपनी असलेल्या सेलीयुरो एनव्ही या हॉलंडमधील कंपनीकडे गेले.
1983 मध्ये या कंपनीचे नाव बदलून ते बर्जर पेन्टस् इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. सध्या या कंपनीची मालकी दिल्लीतील धिंग्रा बंधू यांच्याकडे आहे. आज या कंपनीची वार्षिक (31 मार्च 2019) उलाढाल 6000 कोटी रुपयांवर पोचली आहे. 1969 मध्ये क्लिन्सी कॉर्पोरेशनने भारतातील ही कंपनी बर्जर आणि ब्रिटनमधील जेन्सन अँड निकोल्सन कंपनीला विकली. तेव्हापासून ही कंपनी जगभरातील बर्जर समूहाचा भाग बनली.
तेव्हापासून लुई बर्जर यांच्या पेन्ट क्षेत्रातील समृद्ध वारशाची भारतात सुरवात झाली. 1973 मध्ये कंपनीने इंडस्ट्रियल, मरिन आणि डेकोरेटिव्ह पेन्टच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि नव्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यावेळी कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते मधुकर डोंगरगावकर.
1976 मध्ये कंपनीच्या प्रवासात आणखी एक वळण आले. कंपनीची परकीय मालकी 40 ट्क्क्यांपेक्षा कमी झाली. कंपनीने समभागांचा मोठा हिस्सा यूबी समूहाचे सर्वेसर्वा विठ्ठल मल्ल्या (विजय मल्ल्या यांचे वडिल) यांना विकला. बर्जर समूहात गेली असली तरी 1983 पर्यत या कंपनीचे नाव ब्रिटीश पेन्टस् (इंडिया) लिमिटेड असेच होते.
1983 मध्ये ते बदलून बर्जर पेन्टस् इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. 80 आणि 90 च्या दशकात कंपनीने अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली. कलर बॅंक संकल्पना सुरु केली. ज्याद्वारे लोकांना 5000 रंगछटांमधून रंग निवडण्याची सुविधा उपलब्ध झाली.
1991 मध्ये यूबी समूहाकडील हिस्सा दिल्लीतील के. एस. धिंग्रा आणि जी. एस. धिंग्रा या बंधूंनी आणि यूके पेन्टस् समूहातील त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतला. सध्या धिंग्रा बंधूंकडे कंपनीचे सुमारे 73 टक्के शेअर आहेत आणि कंपनीत पूर्णपणे व्यावसायिक व्यवस्थापन आहे.सध्या अभिजित रॉय हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कंपनीचे मुख्यालय कोलकत्यात असून भारतभर महत्त्वाच्या 16 ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. त्याखेरीज नेपाळमध्ये दोन, पोलंड आणि रशियामध्ये प्रत्येकी एक प्रकल्प आहे. कंपनीचे देशभरात 25 हजारांहून अधिक डिलर आहेत.