कंपनी ओळख : कॅम्सची लक्षणीय वाटचाल

वित्तीय पायाभूत सुविधांमध्ये आघाडी

सुहास यादव
[email protected]

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (सीएएमएस – कॅम्स) ही अतिशय वेगळ्या आणि नगण्य स्पर्धा असलेल्या आणि बहुतांश एकाधिकार असलेल्या क्षेत्रात काम करत आहे. प्रामुख्याने म्युच्युअल फंड कंपन्यांकडील गुंतवणूकदारांच्या खात्यांच्या संगणकीय नोंदी ठेवण्याची सेवा ही कंपनी देते. 

 

अशी सेवा देणारी हे देशातील सगळ्यात मोठी आणि आघाडीची कंपनी आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस्‌ इन इंडियाच्या (ऍम्फी) आकडेवारीनुसार मार्च 2021 अखेर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या पोर्टफोलिओची संख्या 9,78,65,529 वर गेली आहे.

 करोनाच्या काळात लोकांना बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर समजले असल्याने गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यातही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

कॅम्सच्या कामाच्या संधीही वाढत आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांचे बॅंक ऑफिस सांभाळण्याचे कामच कॅम्स एक प्रकारे करत असल्याने या कंपनीसाठी असलेल्या व्यवसायाच्या संधी लक्षात घेऊन प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांनी कॅम्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

गेली वीस वर्षे ही कंपनी म्युच्युअल फंड आणि अन्य वित्तीय संस्थांना तंत्रज्ञानावर आधारीत वित्तीय पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवण्याचे काम करत आहे. डिसेंबर 2020 पर्यंतचा विचार केला तर सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांकडे व्यवस्थापनासाठी असणाऱ्या निधीपैकी (ऍसेट अंडर मॅनेजमेंट) जवळपास 70 टक्के निधीसाठी नोंदणी व अन्य सेवा कॅम्स पुरवत आहे.

याखेरीज पर्यायी गुंतवणूक फंड आणि विमा कंपन्यांनाही कॅस विविध सेवा देते. कंपनीचे भारतभर जाळे असल्याने कॉल सेंटर, मोबाईल ऍप आणि चॅटबोट अशाही सुविधा कंपनी देते.
अत्याधुनिक आणि स्पर्धात्मक तंत्रज्ञान ही कंपनीची जमेची बाजू आहे. त्यामुळे व्यापक आणि गुणवत्तापूर्ण सेवा रास्त शुल्कात देता येते. कंपनीचे स्वतःचे पूर्णपणे हायपर कन्व्हर्ज इन्फ्रास्ट्रक्‍टर (एचसीआय) युक्त असे डेटा सेंटर आहे. काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लॅंग्वेज (एमएल) स्वीकारलेले आहे.

कंपनीने ऑक्‍टोबर 2020 मध्ये शेअर बाजारात पदार्पण केले, पण या कंपनीत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एनएसई इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या उपकंपनीची हिस्सेदारी असल्याने या कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी होऊ शकली नाही केवळ मुंबई शेअर बाजारातच या कंपनीचे व्यवहार होत राहिले. आता एनएसई इन्व्हेस्टमेंट कंपनी कॅम्समधील 37.48 टक्के हिस्सेदारीतून बाहेर पडल्याने मे महिन्यापासून कॅम्सची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी होऊन व्यवहार होऊ लागली आहे.

गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये कॅम्सने भांडवली बाजारातून 1229 ते 1230 रुपये किंमत पट्ट्याने 2242 कोटी रुपये उभे केले आहेत. त्यावेळी कंपनीच्या शेअरची मागणी 47 पटीने वाढली होती.
30 एप्रिल 2021 रोजी असणाऱ्या कंपनीच्या मालकी हक्काचा विचार केला तर कंपनीच्या प्रवर्तकांकडे 30.96 टक्के शेअर आहेत तर 47.90 टक्के शेअर म्युच्युअल फंड, परकीय गुंतवणूक संस्था आणि वित्त संस्थांकडे आहेत.

म्युच्युअल फंडांचा विचार केला तर एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, आदित्य बिर्ला आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड यांच्याकडे सर्वाधिक शेअर आहेत.

परदेशी गुंतवणूक संस्थांमध्ये स्मॉल कॅप वर्ल्ड फंड, फिडेलिटी आणि गोल्डमन सॅक यांचा समावेश होतो. आगामी काळात तंत्रज्ञानावर आधारीत सेवा देण्याचा कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची व्यवस्थापनाची योजना आहे. अर्थात त्यासाठीच्या अनेक संधी कंपनीसमोर उपलब्ध आहेत.

नव्याने उदयास येत असलेल्या वित्तीय पायाभूत सुविधा आणि फ्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात कंपनीचा सहभाग आहे. त्यामुळेच पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या नोंदणी ठेवणारी एजन्सी म्हणून कॅम्सची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अशा या वेगळ्या आणि वाढणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीतील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
कॅम्स – शुक्रवारचा बंद भाव रु. 2275.85 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.