कंपन्यांनी आर्थिक सुधारणांना प्रतिसाद द्यावा – सुब्रमण्यन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने करोना व्हायरसच्या काळात पॅकेज देण्याबरोबरच विविध क्षेत्रासाठी आर्थिक सुधारणा जारी केल्या आहेत. या सुधारणांना कंपन्यांनी पाठिंबा देण्याची गरज असल्याचे अर्थमंत्रालयाचे सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने कामगार क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांचा कंपन्यांना उपयोग होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व देशांनी फक्त औषधोपचार आणि आर्थिक मदतीवर लक्ष केंद्रित केले असतानाच भारताने मात्र या कालावधीत शेती, उद्योग, वीज कामगार या क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत. ही उल्लेखनीय बाब असल्याचे सुब्रमण्यन म्हणाले.

1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणा झाल्या त्यावेळी फक्त उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र, या वर्षी सरकारने भांडवली क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. याबाबत त्यांनी नादारी आणि दिवाळखोरी संहितेचा उल्लेख केला. त्यामुळे भांडवल क्षेत्रात शिस्त वाढण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. भांडवलाबरोबरच कामगार क्षेत्रात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भारतातील प्रश्न कृषी क्षेत्रातील सुधारणाशिवाय सुटणार नाहीत. यासाठी बराच विरोध होऊनही केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सुधारणा केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आता भारताने नियमाच्या आधारित समृद्धी निर्मितीसाठी योग्य नियम तयार केलेले आहेत. या नियमाचा वापर करून खासगी कंपन्यांनी विविध क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ स्वावलंबन नाही तर कार्यक्षमता आणि दर्जा वाढवून देशातील गरजांच्या वस्तू देशातच तयार करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू निर्यात होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.