सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीतील कामगिरीचे बहुतेक कंपन्यांचे आकडे आता जाहीर झाले आहेत. मनीकंट्रोल या संकेतस्थळाने केलेल्या विश्लेषणात गेल्या चार तिमाहीमध्ये सातत्याने प्रॉफिट मार्जिन वाढवत नेणाऱ्या नऊ कंपन्यांमध्ये इस्टर इंडस्ट्रीज, लावरस लॅब, मोरपेन लॅबोरेटरीज, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, दिवीज लॅब, माईंड ट्री लिमिटेड, आरबीएल बॅंक, अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड, वक्रंगी लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होतो.
करोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे शेवटच्या दोन तिमाहीच्या कालावधीत अडचणी आणि अडथळे आले असले तरी त्यातही या कंपन्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. या सर्व कंपन्या 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवल असलेल्या आहेत. यापैकी लावरस लॅब, मोरपेन लॅबोरेटरीज, दिवीज लॅब आणि अमृतांजन हेल्थ केअर या आरोग्याशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या शेअरने या काळात चांगला परतावा दिलेला आहे.
इस्टर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट मार्जिन सप्टेंबर 2019 मध्ये 7.57 टक्के होते आता ते 17.64 टक्क्यांवर पोचले आहे. लावरस लॅबचे प्रॉफिट मार्जिन 7.94 टक्क्यांवरून 21.27 टक्क्यांवर पोचले आहे. मोरपेन लॅबोरेटरीजचे प्रॉफिट मार्जिन 1.92 टक्क्यांवरून 8.08 टक्यांवर आले आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने 14.19 टक्क्यांवरून 29.92 टक्क्यांवर झेप घेतली आहे. या कंपनीच्या शेअरच्या भावात 31 मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 118 टक्क्यांनी वाढ होऊन तो 39.60 रुपयांवर पोचला आहे. दिवीज लॅब्जचे प्रॉफिट मार्जिन सप्टेंबर 2019 मध्ये 24.68 होते ते 29.70 टक्क्यांवर पोचले आहे. माईंड ट्रीचे प्रॉफिट मार्जिन 7.05 वरून 13.17 वर पोचले आहेत.
आरबीएल बॅंकेचे प्रॉफिट मार्जिन 2.44 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांवर आले आहे. मार्च 2020 मध्ये बॅंकेच्या शेअरची किंमत 135.65 रु. होती. 12 नोव्हेंबरपर्यंत त्यामध्ये 49 टक्क्यांची वाढ होऊन तो 202.40 रुपयांवर पोचला.
अमृतांजन हेल्थकेअरचे प्रॉफिट मार्जिन सप्टेंबर 2019 मध्ये 11.23 टक्के होते ते 25.56 टक्क्यांवर पोचले आहे. 31 मार्च 2020 ला कंपनीच्या शेअरचा भाव 329.95 रु. होतो. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत त्यात 44 टक्क्यांची वाढ होऊन तो 474.10 रुपयांवर पोचला आहे.
वक्रांगी लिमिटेड कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये 7.16 टक्क्यांवरून 18.95 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. 31 मार्च 2020 पासून कंपनीच्या शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होऊन 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत तो 26.65 रुपयांवर पोचला आहे.