पिंपरी, (प्रतिनिधी) – वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो,
अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या हभप मारोती महाराज कुरेकर यांच्या 93 व्या व हभप रामराव महाराज ढोक यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हभप कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार तर हभप ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज शिंदे, हभप संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे.
कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात.
मला काय मिळाले यापेक्षा दुसर्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसर्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणार्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले.
मंत्री भुसे म्हणाले, राज्यात वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला अनुदान, वारकरी बांधवांसाठी साहित्य याशिवाय येणार्या काळात किर्तनकारांना सन्मान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पुढील काम सुरू आहे,
ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर म्हणाले, संतांच्या शिकवणीचा, वाङमयाचा विसर पडू नये यासाठी काम करणारी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकर्यांना अध्यात्मिक समाधान मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करत आहे. संस्थेच्या गरजा शासनामार्फत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हभप बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नतूसिंग राजपूत यांनी लिहिलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने प्रकाशित सार्थ गाथेच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन वर्षांत 600 पेक्षा अधिक निर्णय घेतले
गेल्या 2 वर्षात शासनाने 600 च्यावर निर्णय घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकर्याचा मुलगा आहे.
आपल्यालाही गरिबी माहिती आहे. सर्वात जास्त अर्थव्यवस्था चोख बजावणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे.
नदी प्रदूषण मुक्तीचे आराखडे करण्याचे काम ़सुरु
सरकार राज्यातील सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम करत आहे. गड किल्ल्यांच्या विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे आराखडे करत आहोत. महाराष्ट्राला शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदींमध्ये आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.