शिवमोग्गा – कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील जातीय तणावानंतर प्रशासनाने रागी गुड्डा भागात कलम 144 लागू केले आहे. यासोबतच रागी गुड्ड्यात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे काल रात्री धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता.
शिवमोग्गा पोलिसांनी सांगितले की, ‘ईद उल मिलाद मिरवणुकीवर काही समाजविघातक घटकांनी दगडफेक केली होती. यानंतर हिंसाचार उसळला आणि संतप्त लोकांनी वाहने आणि घरांची तोडफोड केली. व्हिडिओच्या आधारे काही लोकांना अटक करण्यात आली आहे.
हा संपूर्ण वाद एका अफवेमुळे झाल्याचं मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटलं जात आहे. खरं तर, ईद उल मिलाद मिरवणुकीत दगडफेक झाल्याची अफवा पसरली, त्यानंतर लोकांच्या जमावाने अनेक घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
1 ऑक्टोबर रोजी परिसरातील काही लोकांनी टिपू सुलतानच्या कटआउटवर आक्षेप घेतला होता, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये आधीच तणाव निर्माण झाला होता. तणावानंतर पोलिसांनी कटआउट झाकले. ज्यावर मुस्लिम बाजूच्या काही लोकांनी कटआउट झाकण्यास विरोध केला. त्यातून हा वाद निर्माण झाला.
शिवमोग्गा येथील जातीय तणावाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात धार्मिक हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, तणावग्रस्त भागात कर्नाटक पोलीस, जलद कृती दल तैनात करण्यात आले आहे.