मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यानंतर शरद पवारांनी नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली होती. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीकडून शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने प्रस्तावाला मंजूरी दिली.
दरम्यान, यासर्व प्रक्रियेवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना,“कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे तोच निर्णय येथे मान्य झाला आहे. शरद पवारांनी जी समिती गठीत केली होती, त्या समितीने एकमताने हा निर्णय केला आहे. साहेबांनी जो मनोदय व्यक्त केला होता तो समितीने अमान्य केला आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांनी पदावर राहावं. आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी पदावर राहावं. शेवटी सर्वानुमते समितीने केलेला ठराव आहे. मला असं वाटतं की, ज्यापद्धतीने शरद पवार लोकशाहीचं पालन करत आहेत, पक्षातील लोकशाहीतसुद्धा समितीने जो ठराव पारीत केलेला आहे तो शरद पवार मान्य करतील.” असे म्हटले आहे.
तर बैठकीनंतर “शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला.
यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो,” असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.