पुणे – खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केलेल्यांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याने, या प्रयोगशाळांची जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी महापालिकेने पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत चर्चा झाली होती.
त्यानुसार ही समिती महापालिकेतर्फे गठीत करण्यात आली आहे. त्यांनी 1 एप्रिल 2021 पर्यंत त्यांचा अहवाल द्यायचा आहे. 15 फेब्रुवारीनंतर करोना रुग्णवाढ वेगाने झाली आहे. दिवसाला सुमारे 3,500 नव्या बाधितांची नोंद होत आहे.
याशिवाय दिवसाला 15 ते 16 हजार स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक टेस्ट खासगी लॅबमध्ये केल्या जात असून, तेथील तपासणी अहवालातील पॉझिटिव्हिटी रेट हा सरकारी प्रयोगशाळांपेक्षा 35 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले आहे.
याबाबतची सत्यता तपासण्यासाठी आणि खासगी लॅबमध्ये होणाऱ्या टेस्ट नियमानुसार होतात का हे पाहणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्जा तपासणी, मानक कार्यप्रणालीचीही त्यांनी तपासणी करायची आहे.
या समितीमध्ये “एनआयव्ही’ या सरकारी प्रयोगशाळेच्या डॉ. वर्षा पोतदार, बी. जे. मेडिकल महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते, “आयसर’चे डॉ. अंजन बॅनर्जी, “नारी’ च्या डॉ. वंदना सक्सेना आणि पुणे महापालिकेचे डॉ. विवेकानंद जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.