एका दिवसात खुलासा करण्याचा आदेश
मुुंबई – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत टिव्ही मालिकांच्या माध्यमातून भाजपाचा छुपा प्रचार करणाऱ्या मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दट्ट्या दिला आहे. या निर्मात्यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांना 24 तासांत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.
झी टीव्ही आणि ऍण्ड टीव्ही या वाहिन्यांनी आपल्या भाभाजी घर पर है, तुझसे है राबता… या मालिकांचा पेडन्यूज सारखा वापर करून निवडणूक आचारसंहितेचा भंग होणारी दृष्ये दाखविली जात आहेत. गेला आठवडभर हा प्रकार सुरू असून मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपातर्फे छुप्या मार्गाने मायावी तंत्री वापरून प्रचार केला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून या वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला केली होती.
टीव्ही मालिकांमधून प्रचार करून भाजपने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून प्रचारासाठी हीन पातळी गाठल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित निर्मात्यांना नोटीस दिली असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली. येत्या 24 तासात या निर्मात्यांनी नोटीसीला योग्य उत्तर न दिल्यास आचासंहिता भंग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले.