नगरसेवक तुषार कामठे : कारवाईसाठी न्यायालयात जाणार
50 लाखांच्या मशिनसाठी दीड कोटी खर्च : तीन अधिकाऱ्यांनी थेट बॅंक खात्यावर घेतली रक्कम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार पुराव्यासह निदर्शनास आणून दिल्यानंतरही आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. आयुक्तांसह या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आपण न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगितले.
नगरसेवक कामठे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. दरनिश्चिती करताना एक रुपयांची वस्तू दहा रुपयांपर्यंत रिंग करून घेण्यात आली आहे. यानंतरही स्पेशिफिकेशन बदलून साहित्य घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार महापालिकेत झाला आहे. आम्ही केवळ दोनच प्रकरणे सध्या निदर्शनास आणली आहेत. यामध्ये महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून खात्यावर रक्कम घेतल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
गेल्या 17 दिवसांपासून आम्ही कारवाईची मागणी करत असताना कोणतीही कारवाई आयुक्तांनी अद्यापपर्यंत केलेली नाही. अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु आहे.
जी प्रकरणे उजेडात आणली आहेत ते केवळ हिमनगाचे टोक आहे. पन्नास लाखांची वस्तू दीड कोटींना घेण्याचा प्रकार सुरू असतानाही आयुक्तांनी अद्यापपर्यंत ते टेंडर रद्द केलेले नाही. याशिवाय थ्री प्लाय सर्जिकल मास्क, थेट पद्धतीने पीपीई किट खरेदी, लॅब केमिकल, आयटीआयसाठी साहित्य खरेदी, आयसीयू युनिट, नेस्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सीरिंज पंप खरेदी, एक्स रे मशीन दुरुस्ती यासह अनेक प्रकारच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
ज्या अधिकाऱ्यांबाबत आम्ही पुरावे सादर केले आहेत त्यांना वाचण्यासाठी एकप्रकारे संधी दिली जात आहे. उसणवारी व्यवहार, इसार पावती असे प्रकार करून खुलासे दिले जात आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. शासनाच्या आदेशानुसार 25 हजारांपुढील उसनवारी अथवा खरेदी-विक्री, इसारपावती असे व्यवहार करताना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. जुने स्टॅम्प गोळा करून त्यावर व्यवहार दाखविला जात आहे. हा प्रकार आयुक्त मान्यच करू शकत नाहीत. पूर्वपरवानगी न घेता अथवा पालिकेशी संबंधित ठेकेदाराशी असे व्यवहार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्याबाबत महाराष्ट्र सेवा वर्तणूक नियमावलीमध्ये स्पष्टपणे आदेशित केलेले आहे. त्यानंतरही आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना वाचविल्यास आयुक्तांविरोधात आम्हाला न्यायालयात जावे लागणार आहे.
कामठे म्हणाले की, सर्व प्रकरणाचे पुरावे आम्ही एकत्र केले आहेत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करणे गरजेचे होते. तसेच चौकशी समितीची स्थापना करून आतापर्यंत चौकशी सुरू करणे अपेक्षित होते. मात्र यातील कोणतीही कारवाई आयुक्तांनी केलेली नाही. आयुक्त कोणाच्या दबावाखाली वावरत आहेत. आयुक्त जर चुकीच्या अधिकाऱ्यांना आणि कामांना पाठबळ देणार असतील तर न्यायालयात जाण्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही. आयुक्तांनी सात दिवसांत कारवाई न केल्यास सर्व पुराव्यानिशी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कामठे यावेळी म्हणाले.
आयुक्तांकडे केलेल्या मागण्या
पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे. गेल्या तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीची चौकशी करावी. या कालावधीत घेतलेल्या प्रत्येक मशिनचे स्पेशिफिकेशन तपासावे. चीनी साहित्य महापालिका स्वीकारणार नाही, असा आदेश असतानाही कोट्यवधी रुपयांचे चीनी साहित्य का स्वीकारले? त्या ठेकेदाराकडून संबंधित रक्कम वसूल करून ज्या अधिकाऱ्यांनी हे साहित्य स्वीकारण्यास मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करावी. दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाची तपासणी करून अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी. चुकीची कामे केलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे. या ठेकेदारांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई सुरू करावी. या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. करोना कालावधीत केलेल्या प्रत्येक खरेदीची चौकशी करावी, अशा मागण्या नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक तुषार कामठे यांनी कोणत्या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली हे ठाऊक नाही. त्यांनी पक्षातील कोणाच्याही कानावर ही गोष्ट घातली नाही. सांगितले असते तर मी पक्षनेता या नात्याने त्यांच्यासोबत आयुक्तांना विचारण्यासाठी गेलो असतो. कामठे यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे. महापालिकेत कोणतेही चुकीचे काम भाजपा पक्ष होऊ देणार नाही.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.