आयुक्तांच्या आदेशाला डॉ. वबळेकडून हरताळ

रुग्णांच्या काळजीऐवजी वायसीएममध्ये मनमानीचा कळस; डॉ. शंकर जाधव यांच्यावरही अन्याय

पिंपरी – गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू असलेल्या मनमानीने आता कळस गाठला आहे. आयुक्तांनी वायसीएम रुग्णालयात नियुक्‍तीचे आदेश दिल्यानंतरही डॉ. शंकर जाधव यांच्या केबिनला कुलूप लावून त्याची चावी जवळ ठेवण्याचा प्रकार डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केल्यामुळे अस्थापनेवरील डॉक्‍टरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आयुक्‍तांपेक्षा वाबळे मोठे झालेत का? असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. विशेष बाब म्हणजे डॉ. वाबळे यांच्याकडील वायसीएमचा कार्यभार कायदेशीर नसतानाही त्यांनी चालू केलेल्या या प्रकारामुळे आश्‍चर्य व्यक्‍तहोत आहे.

गेल्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख व वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांची जाणीवपूर्वक व महापालिकेतील दोन पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर बदली करुन अनुक्रमे जिजामाता व भोसरी रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर, दोन दिवसांनी आयुक्‍तांनी दोघांच्याही बदल्या रद्द करुन पूर्वीच्या ठिकाणी नियुक्‍ती करण्यासंबंधी परिपत्रक काढले. तसेच जिजामाता व भोसरी रुग्णालयाची अतिरिक्‍त जबाबदारी दोघांकडे देण्यात आली. यानंतर, हे दोन्ही डॉक्‍टर पुन्हा आपल्या पूर्वीच्या ठिकाणी अर्थात वायसीएम रुग्णालयात परतले. डॉ. देशमुख आणि डॉ. जाधव दोघांच्याही केबिन तळमजल्यावर शेजारी-शेजारी आहेत.

महापालिकेच्या नियोजित पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना बसण्यासाठी पूर्वीप्रमाणे असणारे केबीन दिले. मात्र, उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांना चाव्या देण्यास नकार देत, भोसरी रुग्णालयातून काम करण्याचे फर्मान सोडले. आयुक्‍तांचे आदेश असतानाही जाधव यांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाबळे यांनी केबिन दिले नाही तसेच या केबिनच्या चाव्या स्वत:जवळ ठेवल्या. गेल्या चार दिवसांत स्वत: जाधव यांनी मागणी केली तसेच आपल्या स्वीय सहायकाला पाठवून चाव्या मागितल्यानंतरही दिल्या नाहीत. जाधव यांच्यावर वाबळे यांचा एवढा आकस का? असा प्रश्‍न आता चर्चिला जावू लागला आहे.

केबिनमध्ये गैरप्रकार होतात म्हणून चावी दिली नाही
डॉ. शंकर जाधव यांची बदली झाल्यानंतर ही केबिन उघडी होती. या केबिनमध्ये डॉ. जाधव यांच्या अनुपस्थितीत गैरप्रकार सुरू होते म्हणून आपण केबिन बंद करून चावी आपल्याजवळ घेतल्याची माहिती डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. आपण त्यांना चावी देण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

बेजबाबदार दावा
शंकर जाधव यांच्या अनुपस्थितीत या केबिनमध्ये गैरप्रकार होत असल्याचा अत्यंत बेजबाबदार दावा डॉ. वाबळे यांनी केला. हे लोक काय गैरप्रकार करत होते हे सांगण्याचे टाळतानाच आपण कोणालाच घाबरत नसल्याचे वाबळे म्हणाले. जे लोक गैरप्रकार करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असताना केबिनला चावी लावण्याचा प्रकारच आश्‍चर्यकारक आहे.

ते दोन पदाधिकारी कोण?
डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या माध्यमातून वायसीएम रुग्णालयातील ठेकेदारी हातात घेण्यासाठी प्रयत्न करणारे “ते’ महापालिकेचे दोन पदाधिकारी कोण? अशी चर्चा पालिका आणि वायसीएमच्या वर्तुळात रंगली आहे. वायसीएम रुग्णालयासाठी दरवर्षी करोडो रुपयांचे साहित्य आणि औषधे खरेदी केली जातात. या खरेदीमध्ये आपली दुकानदारी उभी करण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून या दोन पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या सुरस कथा सध्या पालिका वर्तुळात रंगल्या आहेत.

डॉ. वाबळे यांच्याकडील पदभारच बेकायदा
डॉ. राजेंद्र वाबळे हे तीन वर्षांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या नियोजित पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून रुजू झाले आहेत. वाबळे हे मानधनावरून असून वायसीएमचे प्रमुखपद हे स्थायी स्वरुपाचे आहे. मानधनावरील अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्‍त व्यक्तीकडे आर्थिक व प्रशासकीय अधिकार देता येत नाहीत. हे वाबळे यांच्याच नियुक्‍तीपत्रात नमूद केले आहे. असे असतानाही वाबळे यांच्याकडे पालिकेतील दोन पदाधिकाऱ्यांच्या दुकानदारीसाठी हे पद जाणीवपूर्वक देण्यात आले. वाबळे यांनी रुग्णांकडे लक्ष देण्याऐवजी सुरू केलेला मनमानी कारभार आता उजेडात येवू लागल्याने वाबळे यांची नियुक्‍ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आयुक्‍तांचा आदेश डावलणारे वाबळे कोण?
महापालिका आयुक्‍त हे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यांचा आदेश अंतिम असतो, हे सर्वज्ञात आहे. माझी नियुक्ती आयुक्तांच्या आदेशाने झाल्यानंतरही मला केबिन न देण्याचा आणि मला जाणीवपूर्वक टॉर्चर करण्याचा प्रकार डॉ. वाबळे यांनी केला. महापालिकेच्या रुग्णालयात वर्षानुवर्षे रुग्णांची सेवा करण्याचे फळ डॉ. वाबळे यांनी दिले आहे. माझा अपमान करण्याचा आणि आयुक्‍तांचा आदेश डावलण्याचा त्यांना कसलाही अधिकार नसताना त्यांनी चालविलेला प्रकार संतापजनक असून याबाबत आपण आजच (बुधवारी) आयुक्‍तांकडे लेखी तक्रार केल्याची प्रतिक्रिया डॉ. शंकर जाधव यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)