पिंपरी – सद्यस्थितीत जम्बो कोविड रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्राप्त होत असलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.20) या रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. सुमारे तासाभराच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेत, संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत, कारभारात सुधारणा करण्याबाबत सक्त ताकीद दिली.
शहरातील करोनाबाधितांवरील उपचाराकरिता काही दिवसांपूर्वी नेहरुनगर येथे सुरु केलेले जम्बो कविड सेंटर तत्काळ फुल्ल झाले. या रुग्णालयाचे व्यवस्थापन खासगी ठेकेदाराकडे देण्यात आले असून, रुग्ण व नातेवाईकांना मिळणारी चुकीची माहिती, बेड शिल्लक असताना सर्व बेड फुल्ल असल्याची खोटी माहिती देणे अशा अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
रुग्णालयाबाबत अनेक गंभीर तक्रारी येत असल्याने पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, वायसीएमचे डॉ. पाठक, जम्बो कोविड रुग्णालयाचे समन्वयक खांडेकर, जोशी, सुनिल वाघमारे तसेच जम्बो कोविडचे मुख्य संग्राम कपाले यांच्या समवेत जम्बो कोविडच्या आयसीयू 2 व इतर वॉर्डातील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला.