आयुक्‍तसाहेब, मला नदीत पोहायचं आहे!

वर्मावरच बोट : इरसाल पुणेकराच्या प्रश्‍नाने प्रशासन चक्रावले

पुणे – शहराच्या इतिहासाची साक्ष असलेली मुळा-मुठा नदी देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये जाऊन पोहचली आहे. गेल्या तीस ते 35 वर्षांत ही स्थिती उद्भवली आहे. मात्र, ही नदी केव्हा स्वच्छ होणार असा प्रश्‍न प्रत्येक पुणेकराच्या मनात असला, तरी एका इरसाल पुणेकराने महापालिका आयुक्तांना ई-मेल पाठवित “आयुक्तसाहेब, मला नदीत पोहायचं आहे. मला नदीत कधी पोहता येईल.’ असा प्रश्‍न विचारला आहे. त्यामुळे एरवी प्रत्येक पुणेकरांच्या पत्राला उत्तर देणाऱ्या महापालिका प्रशासनालाही या इ-मेलवरील प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचे हा प्रश्‍न पडला असून हा ई-मेल उत्तरासाठी सर्व विभागांच्या फेऱ्या मारत आहे. राजन शाह असे या ई-मेल पाठविणाऱ्या पुणेकराचे नाव आहे.

गेल्या अडीच दशकात शहराचे नागरीकरण प्रचंड प्रमाणात झाले आहे. मात्र, या नागरिकरणाचा पहिला बळी शहराच्या मध्यातून वाहणारी मुळा-मुठा नदी ठरली आहे. शहरात निर्माण होणारे सांडपाणी उपाय योजना न करताच थेट नाल्यांमधून नदीत येत असल्याने नदीच्या बहुतांश भागातील जैवविविधता संपुष्टात आली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये मुळा-मुठा नद्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानंतरही महापालिकेकडून अथवा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून नदीसाठी विशेष लक्ष न दिले गेल्याने हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता नदीत अनेक ठिकाणी जिवंत झऱ्यातून पाणी येत असले, तरी नदीचा अनेक ठिकाणी प्रचंड दुर्गंध येत असून नदीत केवळ सांडपाणीच आहे. त्यामुळे या पाण्यात जनावरेही उतरत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडून सुमारे 1 हजार कोटींची नदी सुधार योजना राबविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ मान्यतांच्या फेऱ्यातच हा प्रकल्प असून त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे नदीची ही अवस्था पाहून ही नदी आहे, की नाला? असा प्रश्‍न उपस्थित अनेक पुणेकरांच्या मनात उपस्थित होतआहे. तर, राजन शहा यांनी थेट आयुक्तांनाच प्रश्‍न विचारून शहराच्या गंभीर प्रश्‍नावर पुन्हा एकदा बोट ठेवले आहे. त्यामुळे शहा यांच्या प्रश्‍नाला आयुक्त कार्यालयाकडून उत्तर न देता हा ई-मेल पाणी पुरवठा आणि ड्रेनेज तसेच घनकचरा विभागास पाठविण्यात आला असून या प्रश्‍नाला काय उत्तर देणार? असे सांगत अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

असा आहे शहा यांचा ई-मेल
नमस्कार महोदय,
मी राजन शाह. मला नदीमध्ये पोहायचं आहे. पण, नदीमधील पाणी खूपच घाण असल्याने मला नदीमध्ये पोहायला जाता येत नाही. मला आपल्या शहरातील नदीमध्ये केव्हा पोहता येईल, हे आपण मला सांगाल का? मी आपल्या उत्तराची वाट पाहतो आहे.
धन्यवाद,

आपला पुणेकर
राजन शाह

Leave A Reply

Your email address will not be published.