घरातूनच पालिकेचा कारभार : सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पिंपरी – भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतले आहे. तसेच आयुक्तांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाचा “करोना’ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयुक्तांनी स्वतःस होम क्वॉरंटाइन करून घेतले आहे.
आयुक्त हर्डीकर यांचे स्वॅबचे नमुने मंगळवारी (दि. 30) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या अहवालाकडे संपूर्ण मनपा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दोनच दिवसांपूर्वी आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या, त्यामुळे अनेकांची चिंता वाढली. याशिवाय विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यानही आयुक्तांचा महेश लांडगे यांच्याशी संपर्क आला होता. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. होम क्वॉरंटाइनबरोबरच त्यांचे घश्यातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आयुक्त हर्डीकर यांचे तुर्तास तरी त्यांचे दोन दिवसांपासून “वर्क फ्रॉम होम’ सुरू असून घरातूनच महापालिकेचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह?
दरम्यान रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते, परंतु रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून याबाबत पुष्टी करण्यात आलेली नव्हती.
पालिकेत शुकशुकाट
शहरात करोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. पोलिसांसोबतच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पालिका भवनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली असून, नागरिकांनीही पालिकेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, पालिका भवनात मंगळवारी (दि. 30) शुकशुकाट होता.
आतापर्यंत महापालिकेच्या 25 अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. दोन नगरसेवकांसह त्यांचे नातेवाईक आणि माजी नगरसेवकांना करोनाची लागण झाली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे ही होम क्वारंटाइन झाले आहे. त्यामुळे ते दोन दिवसांपासून पालिकेत येत नाहीत. तसेच, काही पदाधिकारी व नगरसेवकांच्या घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटी घेऊन घरी राहणे पसंत केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव होईल म्हणून नगरसेवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते ही पालिकेत फिरकेनासे झाले आहेत. पालिका भवनाच्या प्रवेशद्वारावरही नागरिक व ठेकेदारांना प्रवेश नाकारला जात आहे. करोनाच्या भितीमुळे पालिकेत आज (मंगळवारी) अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक तसेच, नागरिकांची खूपच कमी उपस्थिती होती. परिणामी सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
सुरक्षिततेसाठी सध्या होम क्वॉरंटाइनमध्ये आहे. महापालिकेशी निगडित कामकाज सध्या घरातूनच चालू आहे. करोना टेस्टसाठी स्वॅब पाठविण्यात आले असून रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका