दिल्लीतील हिंसाचाराच्या संबंधात आयोग नेमून चौकशीची मागणी

नवी दिल्ली – दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्‍टर रॅलीच्यावेळी जो हिंसाचार झाला, त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून चौकशी केली जावी अशी मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात विविध संबंधीत कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई केली जावी अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या आंदोलनात 300 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणात 22 गुन्हे नोंदवले आहेत.

ऍडव्होकेट विशाल तिवारी यांनी ही याचिका केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की हा आयोग तीन सदस्यांचा हवा आणि त्यातील दोन न्यायाधिश हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश असावेत. आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडे द्यावे. या आंदोलनामुळे सरकारने इंटरनेट सेवा बंद केली आहे.

त्यामुळे कोर्टाच्या कामकाजावरही विपरित परिणाम झाला आहे असे त्यांनी या याचिकेत नमूद केले आहे. सध्या अनेक खटल्यांचे कामकाज ऑन लाईन पद्धतीनेच सुरू असते असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.