लक्षवेधी: सामाजिकीकरणाच्या नावाखाली शिक्षणाचे व्यावसायिकीकरण

डॉ. तुषार निकाळजे

नुकतीच इयत्ता 11 वी च्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली. अद्याप 10 वीचा निकाल जाहीर व्हावयाचा आहे. याकरिता समुपदेशनाची सुरुवात झाली आहे. यादरम्यान शासनाने माहिती पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेची किंमत 150 रुपये आहे. प्रत्येक पुस्तिकेत एक पासवर्ड दिला आहे. ज्या विद्यार्थ्याकडे ही पुस्तिका व पासवर्ड आहे, तोच प्रवेश अर्ज भरू शकतो. म्हणजे दहावीच्या प्रत्येकाने ही पुस्तिका विकत घेणे अनिवार्य ठरते.

महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचे अंदाजे 17 लाख परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. 17 लाख विद्यार्थ्यांनी 150 रुपयांची माहिती पुस्तिका विकत घेतल्यास शासनाच्या तिजोरीत 25 कोटी 80 लाख रुपये जमा होतील. या माहिती पुस्तकाची शासकीय छपाई खर्चाची एकूण 5 कोटी 40 लाख (प्रत्येकी 30 रुपये) प्रमाणे किंमत होते. म्हणजे शासनास या माहिती पुस्तिकेमार्फत 20 कोटी 40 लाख रुपये नफा होईल. नुकतेच निवडणुकांचे संचलन व निकाल जाहीर झाले.

निवडणुकांपूर्वी सरकारी तिजोरीतील पैशाचा वापर वेगवेगळ्या योजना, सवलती, दुरुस्त्या यांच्यावर खर्च करण्यात आला. आता तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झाला की काय? असा प्रश्‍न उपस्थित राहतो. या निमित्ताने प्रवेश प्रक्रिया ही एक सुवर्णसंधी असावी. केंद्रीय पद्धतीने नंतर प्रवेश प्रक्रिया होते व टक्‍केवारी, आरक्षण, शाखानिहाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी वर्ग केले जाते. हल्ली बुद्धी कलमापन चाचण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्याचे शुल्क 800 रुपये ते 5 हजार रुपये असते. यापूर्वीचे बुद्धिमंत महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गो. कृ. रानडे, गो. ग. आगरकर, भगतसिंग, राजगुरू, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दारासिंग, राजेश खन्ना, प्रेमचंद डोग्रा, कार्ल मार्क्‍स, हेन्‍री फेयॉल, मॅक्‍स वेबर, सर आयझॅक न्यूटन, गॅलिलिओ यांच्या कालावधीमध्ये बुद्धी कलमापन चाचण्या होत्या का? आणि त्यांच्या यशाचे रहस्य कोणते? याचा विचार करावा.

दुसरा टप्पा सुरू होतो तो महाविद्यालयामध्ये. महाविद्यालयांचा प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका यांची किंमत वेगळी. किमान 200 रुपये ते 800 रुपयेपर्यंत किंमत असते. नंतर अनुदानित, विनाअनुदानित, वार्षिक शिक्षण शुल्कांच्या रकमा महाविद्यालयनिहाय वेगळ्याच. पालकांनाही स्वतःच्या पाल्याने शास्त्र वा अभियांत्रिकी यांसारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यात मोठेपणा. पाल्यांनी कितीही नाक मुरडले तरी पालकांचा कित्ता गिरविणे कायमच असते. तरीही शिक्षणव्यवस्था स्वतःची प्रगती करताना चौथ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय व्यवसाय, अभियांत्रिकी व्यवसाय, सनदी अधिकारी आणि यांपैकी काही झाले नाही तर शिक्षक किंवा प्राध्यापकी पेशाकडे वाटचाल. हा आता ट्रेंड बनला आहे. इतर पहिल्यापासूनच छोट्या मोठ्या खासगी व्यवसाय शिक्षणाच्या पूरक शोधात असतात.

एका ऑलिंपिक सुवर्ण पारितोषिक विजेत्या तरुणास सरकारने मोफत विमान प्रवास, मोफत वातानुकूलित रेल्वे प्रवास सवलत दिली आहे. परंतु या 35 वर्षांच्या खेळाडूने एक खंत व्यक्‍त केली, “”मला माझे शालेय मित्र, बालपणीचे मित्र उपभोगता आले नाही. मी माझे बालपण हरवून बसलो.”

यापुढे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. त्यामधील प्रकार वेगळेच. स्वायत्त संस्था, अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे इत्यादी. या विद्यापीठांची शुल्क रचना वेगवेगळी. काहींची दुप्पट, काहींची तिप्पट तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या 5 पट शुल्क रकमा असतात. हल्ली आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा ट्रेंड, गरज, हौस, प्रतिष्ठा चालू झाली आहे. या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. परंतु बॅंकांनी शैक्षणिक कर्ज देणे सुरू केले आहे. त्याकरिता स्वतः आयुष्यभर कमविलेल्या पैशातून घेतलेले घर, फ्लॅट, गहाणवट ठेवताना दिसतात. असे विद्यार्थी नंतर परदेशात नोकऱ्या मिळवितात. पालकांनाही ही फुशारकी मारण्यात मोठेपणा, प्रतिष्ठा वाटते. परंतु या पाल्यांच्या लग्नासाठी मात्र भारतीयच वधू-वर संशोधन करतात.

हा विषय बोलावा, लिहावा तेवढा कमीच आहे. यापूर्वीच्या वेगवेगळ्या समाजसुधारकांनी शिक्षण हे समाज निर्मितीचे क्षेत्र, भावी पिढी तयार करण्याचे पवित्र स्थान म्हणून पावित्र्य राखले. महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, इत्यादींनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. परंतु आज या समाजिकीकरणाच्या नावाखाली शिक्षणाचे व्यावसायिकीकरण होऊ लागले आहे. जसे साखर कारखाने, औषध कारखाने, माहिती व तंत्रज्ञान कारखाने, फिल्म इंडस्ट्री तयार झाल्या त्याप्रकारे आता शिक्षण हा पांढरपेशी व्यवसाय उदयास आला असे वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.