उर्मिला मातोंडकर यांच्यावर अश्‍लील शब्दांत टिप्पणी

पुण्यात एकाविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज
पुणे  – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून अश्‍लिल शब्दांत टीकाटिप्पणी करणाऱ्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. ऍड. रूपाली ठोंबरे पाटील यांनी धनंजय कुडतरकर या व्यक्‍तीविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

उर्मिला मातोंडकर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून कॉंग्रेसपक्षाकडून उभ्या होत्या. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे गोपाळ शेट्टी हे उमेदवार होते. शेट्टी यांच्याकडून मातोंडकर यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर कुडतरकर या व्यक्‍तीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून मातोंडकर यांच्यावर अत्यंत अश्‍लील शब्दांत टीका केली आहे. कुडतरकर यांच्या अकाऊंटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून ते उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत असून त्यांनी अशाप्रकारे केलेल्या टीकेतून समस्त महिला वर्गाचा अवमान झाला आहे, असे ठोंबरे पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

या व्यक्‍तीविरोधात तत्काळ विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलगुटकर यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप संबंधित व्यक्‍तीवर गुन्हा दाखल केला नसून योग्य ती कायदेशीर माहिती घेऊन व सायबर विभागाच्या मदतीने कारवाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.