अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु

मुंबई : राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून सुरु झाली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती. तीच सेवा आजपासून पुन्हा एकदा मर्यादित स्वरूपात सुरु करण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे.
शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल.

मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली जावी यासाठी राज्य सरकार अनेक दिवसांपासून आग्रही होतं. यासंदर्भात एक महत्वाची बैठक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या या उपनगरीय सेवेच्या फेऱ्यात कोणाकोणाला प्रवास करता येईल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.