पिंपरी : महापालिका आणि लष्कर यांच्यात वाटाघाटी होत नसल्यामुळे रखडलेल्या पिंपळे सौदागर येथील १८ मीटर रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. लष्कराने जागा हस्तांतरित केल्यामुळे महापालिकेने रस्ता व लष्कर सीमाभिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. आता बीआरटी रोड ते ट्रॉईज सोसायटी पुढे नॅचरल आइस्क्रीम कॉर्नरपर्यंत सुसज्ज रस्ता केला जाणार आहे.
पिंपळे सौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर संपूर्ण उपनगराचा दर्जेदार विकास करण्यात आला. परंतु, लष्कराच्या हरकतीमुळे १८ मीटर रस्त्याचे काम सुरु करण्यात अडथळे येत होते. १८ मीटर रस्त्यासाठी लागणारी जागा लष्कराकडून ताब्यात घेण्यासाठी विलंब होत होता. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी लष्कर आणि महापालिका यांच्यात समन्वय घडवून आणला.
वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर लष्कराने रस्त्यासाठी लागणारी जागा देण्यास होकार दिला. तत्पुर्वी महापालिकेने येथील १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द केली होती. जागा ताब्यात नसल्यामुळे तसेच तांत्रिक त्रुटी असल्यामुळे निविदा बरेच महिने रखडली होती. आता जागा ताब्यात आल्यामुळे रस्त्याच्या आणि लष्करी सुरक्षा भिंतीच्या कामाला महापालिकेने सुरुवात केली आहे.
या रस्त्याची लांबी ९२० मीटर असून रुंदी १८ मीटर आहे. अत्याधुनिक पध्दतीने रस्ता विकसित करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुला दोन मीटर रुंद सुसज्ज पदपथ असणार आहेत. एका बाजुला १०५ मीटर रुंदीचा सायलक ट्रॅक असणार आहे. १०५ मीटरचे दोन्ही बाजुला पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. या रस्त्यामुळे नाशिक फाटा येथून हिंजवडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी असणा-या बीआरटी मार्गावर स्वराज गार्डन चौक, गोविंद गार्डन चौक, कोकणे चौक आणि शिवार चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे हिंजवडी अथवा पुण्यात जाण्यासाठी प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
नाना काटे यांनी केली कामाची पाहणी
महापालिकेने काम हाती घेतलेल्या १८ मीटर रस्त्याची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज बुधवारी (दि. १९) पाहणी केली. त्यांच्यासोबत स्थापत्य विभागाचे उपाभियंता सुनील शिंदे, कंत्राटदार, सल्लागार उपस्थित होते. या रस्त्याच्या निर्मितीसाठी १४ कोटी ८२ लाख ८९ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या जागेचे पालिकेकडे हस्तांतरण झाले. दोन्ही बाजूंच्या समन्वयामधून हे काम शक्य झाले. या रस्त्यामुळे नाशिक फाटा येथून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. काटे वस्ती, गोविंद गार्डन आणि ट्राइज सोसायटीकडे वाहने सहज जाऊ शकतील. वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या रस्त्याचा परिसरातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांना लाभ होणार आहे. हा रस्ता हिंजवडी आणि वाकडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोयीचा मार्ग ठरणार आहे.
– विठ्ठल उर्फ नाना काटे
माजी विरोधी पक्षनेते