शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शक्तीप्रदर्शन
मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली ताकद दाखविण्यासाठी 162 आमदारांचे शक्तीप्रदर्शन माध्यमांपुढे घडवले. येथील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये सात वाजण्याच्या सुमारास हा सोहोळा रंगला आहे. राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय नाट्यात हे पाउल उचलण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी रात्री उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील असे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा भारतीय जनता पक्षाला असल्याचे पत्र राज्यपालांना दिले. त्यानंतर पहाटे दोघांचा शपथविधी झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याबाबतचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून सर्वोच्च न्यायलयात त्यावर उद्या निकाल देणार आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यात ते म्हणतात, 162 आमदार एकत्र प्रथमच पहायला मिळतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: येऊन खातरजमा करावी,असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या कृतीच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली आहे. न्या. एनव्ही रमण्णा, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. त्यावर उद्या सकाळी साडे दहा वाजता निर्णय दिला जाणार आहे.
या तीनही पक्षांनी सोमवारी बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. त्याला फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोध केला आहे. राज्यपालांनी त्यांना बहुमत सिध्द करण्यासाठी 14 दिवसांची मुदत दिल्याचा दावा करण्यात येत आहे.