पुणेः गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत या आजाराने दोन जण दगावले आहेत. आता रुग्णसंख्या ७३ वर जाऊन पोहचली आहे. काही रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती असून या आजाराचा खर्च देखील मोठा आहे. यामुळे या आजारावरती मोफत उपचार मिळावेत अशी मागणी केली जात होती, अखेर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आजारावर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. गुइलेन बॅरी सिंड्रोम आजारावर पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात मोफत उपाचार करण्यात येणार आहेत. याविषयीच्या सूचना महापालिकेच्या आयुक्तांना दिल्या असल्याची माहिती पवार यांनी यावेळी बोलतान दिली. तसेच नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पुरस्कारार्थ्यीचे अभिनंदन
अनेकांनी स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिले. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 75 वर्षात प्रत्येक संकटाला समोर जाणारे काम देशवासीयांनी केलं, संपूर्ण देश एक आहे ही, भावना आपण मजबूत केली. हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आहे. आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला आहे. केंद्र सरकारने काल पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार मिळालेल्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो, असेही पुढे अजित पवारांनी म्हटले आहे.