बेल्हे (प्रतिनिधी):- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे मुंबईवरून आलेल्या एका ३८ वर्षीय महिलेला संशयित करोना रुग्ण म्हणून शनिवार (दि.१६) रोजी गावातील अंगणवाडीत केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. ही महिला रेड झोन असलेल्या मुंबई शहरातून आली असल्याने गावात आल्या बरोबर महिलेला अंगणवाडी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेला करोना संशयित म्हणून पुण्यातील औंध येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संबंधित महिलेचा मंगळवार (दि.१९) रोजी तपासणी अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे व निमगाव सावा गावचे तलाठी विजय फलके यांनी दिली.त्यामुळे आता निमगाव सावा व साकोरी करांना गेल्या तीन दिवसांपासून असणारी चिंता मिटली आहे.
निमगावात मंगळवार पर्यंत जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी केंद्रात क्वारंटाईन केलेले ९ लोक आहेत.ग्रामपंचायतिकडून सर्व नियमांचं पालन केल जात असून नागरिकांना सतत आरोग्य जनजागृतीच्या सूचना दिल्या जात आहेत.
“निमगाव सावा येथील करोना संशयित महिलेला दोन दिवसांपूर्वी औंध येथील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवलं होत.त्यांची करोना तपासणी केली असून आज मंगळवारी तपासणी अहवाल अहवाल प्राप्त झाला असून अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना पुढचे काही दिवस क्वारंटाईन च्या सूचना देण्यात आल्या आहेत.” -डॉ.उमेश गोडे, आरोग्य अधिकारी ,जुन्नर.