मुंबई- मुंबईमध्ये नवीन करोनाबाधितांच्या संख्येत काही दिवसांपासून सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत असून आज करोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 384 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला 18 हजार 40 सक्रिय करोनारुग्ण आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 581वर पोहोचली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी करोनावर मात केली आहे. यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर पोहोचला आहे.