दिलासादायक! भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन लस पहिल्या टप्प्यात यशस्वी

मुंबई : भारतात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. यातच दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाची लस विकसित करणारी भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन या लसीच्या पहिला टप्प्यातील क्‍लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. कोवॅक्‍सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस सुरक्षित आहे. कोवॅक्‍सिनवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी याविषयी माहिती दिली आहे.

भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्‍सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बेळगावात या लसीची चाचणी सुरु आहे. कोरोना व्हायरसवर स्वदेशी लस तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत वेगाने पावले टाकत आहे. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाच्या लसीची सहा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे.

भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचे 12 शहरांमध्ये परीक्षण केले जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे.

पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्‍सिनवर संशोधन करणाऱ्या सविता वर्मा म्हणाल्या की, “कोवॅक्‍सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.