दिलासा ! बाधितांच्या त्सुनामीत मृत्यू मोजकेच; करोनावर काहीसा विजय

पुणे  – करोनाबधितांच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या प्रमाणात सुमारे 60 टक्के घट झाली तर बाधितांच्या संख्येत मात्र 44 टक्के वाढ झाली आहे. दोन्ही वर्षात याबाबत एकच समान गोष्ट आढळली, ती म्हणजे 10 वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कायम राहिले आहे.

पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूची संख्या लक्षात घेऊन मृत्यूदर (सीएफआर) काढला जातो. पहिल्या लाटेत विविध वयोगटातील बाधितांच्या मृत्यू संख्येची वर्गवारी करण्यात आली. दोन्ही लाटेत 31 ते 40 वयोगटातील लोकांनाच अधिक संसर्ग झाला. तर 60 वर्षावरील गटातच मृत्यू संख्या अधिक होती.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी करोनाच्या लाटेचा सर्वाधिक फटका 60 वर्षांखालील व्यक्तींना बसला. या वयोगटातील 13 हजार 318 बाधितांचा यावर्षी मृत्यू झाला. तर पाच लाख जण बाधित झाले. 2020 मध्ये तीन लाख हजार जणांना बाधा झाली, त्यात 39 हजार 192 जणांचे मृत्यू झाले.

80 ते 89 वयोगटातील मृत्यूचे प्रमाण 3.8 होते ते गेल्या वर्षी 11.2 होते. 70 ते 79 वयोगटातील प्रमाण 3.6 इतके आहे. ते गेल्यावर्षी 9.3 टक्के होते. राज्याचे साथरोग नियंत्रण अधिकारी प्रदीप आवटे म्हणाले, ज्येष्ठांमध्ये यावर्षी सुमारे तीप्पट घट आढळली. 20 ते 50 वयोगटात 19 लाख जणांना करोनाची बाधा झाली तर मृत्यूदर 0. 28 टक्के आहे. 2020 मध्ये 11 लाख जणांना बाधा झाली. तर मृत्यू दर 0.82 टक्के इतका होता.

भारतात सध्या दररोज सुमारे तीन लाख 43 हजार बाधित होत आहेत. तर चार हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे म्हटले जात असतानाच त्याबाबत साथरोगतज्ज्ञ सावधानतेचा इशार देत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी किमान पहिला डोस घेतला आहे आणि बाकीचे कदाचित गेल्या लाटेत बाधित झाले असावेत, असा आशावाद साथरोग तज्ज्ञ डॉ. गिरीधर बाबू यांनी व्यक्त केला.

मात्र डॉ. आवटे म्हणाले, वैद्यकीय व्यवस्थापन अधिक सुनियोजित झाले. कारण 60 वर्षावरील वयोगटात अद्याप केवळ पाच टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले आहे.

राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नगरकर म्हणाले, तरूणांच्या मृत्यूवर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण तेथे धोका अधिक अहे. सर्व अतिदक्षता विभाग 20 ते 50 वर्षांच्या वयोगटातील बाधितांनी भरून गेले आहेत. आपण मृत्यू दराचे कारण आणि निष्कर्ष काढण्याआधी काही काळ थांबायला हवे, असे ते म्हणाले.

मे अखेरीस याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल. दुसऱ्या लाटेने सारी व्यवस्थाच काही काळ कोलमडून पडली होती. विशेषत: खासगी रुग्णालयांनी सर्व मृत्यू नोंदवले नसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदी आणि स्मशानातील नोंदींची पडताळणी केल्यानंतर त्याबाबत स्पष्टता येईल, असे डॉ. बाबू यांनी स्पष्ट केले.

डॉ. आवटे म्हणाले, मृत्यू दर घटल्याची प्राथमिक चिन्हे तर आहेत. सप्टेंबर महिन्यात 2020च्या लाटेचा पिक होता. त्यावेळी मृत्यूदर दोन टक्के होता. दुसऱ्या लाटेचा पिक एप्रिलमध्ये आला. त्यावेळचा मृत्यू दर 0.77 टक्के आहे. जरी समजा न कळवलेले मृत्यू धरले तरी ते काही हजारांमध्ये नाहीत.

केवळ 10 वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण मात्र कायम राहिले आहे. जानेवारी ते नऊ मे या काळात या वयोगटातील 87 हजार 463 जणांना लागण झाली. त्यात 108 जणांचा मृत्यू झाला. त्या तुलनेत 2020 मधील नऊ महिन्यात 67 हजार 110 जणांना लागण झाली होती. 2020 मध्ये मृत्यूचे हे प्रमाण 0. 14 टक्के होते ते यंदा 0.12 टक्के आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुरेश मेश्राम म्हणाले, तीव्रतेच्या बाबतीत दुसरी लाट अधिक मोठी होती. आम्ही 40 – 50 जणांचे मृत्यू रोज पहात होतो. नागपूर जिल्ह्यात जवळपास 100 मृत्यू होत होते. तीशी आणि चाळीशीतील बाधित दाखल झाल्यानंतर दिवसभरात प्राण सोडत होते. ऑक्‍सिजनची गरज खूप वाढली होती. रुग्णालये तुडूंब भरली होती. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापुर्वी थोडे थांबू या.

2020 मध्ये सुमारे 19 लाख 44 हजार बाधित होते. त्यात 48 हजार 456 मृत्यू झअले. तर 2021मध्ये 31 लाख 17 इतकी बाधितांची संख्या वाढली मात्र, मृत्यू साधारणत: 24 हजार 400 च्या आसपास आहेत. बाधितांची संख्या विलक्षण वाढली. अतीदक्षता विभाग नेहमी भरलेले होते. पण, डॉक्‍टरांना हा आजार गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक चांगल्या पध्दतीने समजला होता. त्यामुळेच मृत्यू कमी जाले, असे कोविड मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.