फोन, व्हिडिओ कॉलद्वारे मुलाशी बोलण्यास न्यायालयाची परवानगी
पत्नी संवाद साधू देत नसल्याने मागितली दाद
पुणे – घटस्फोटाचा दावा दाखल असल्याने मुलापासून कित्येक महिने लांब असलेल्या बापाला पुणे दिवाणी न्यायालयाने दिलासा दिला आहे. आपल्या चार वर्षांच्या मुलाला करोनची लक्षणे दिसत असून, त्याच्या वैद्यकीय तपासणीची माहिती पत्नी लपवत असल्याने मुलाशी रोज बोलता यावे, यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या पित्याला दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे मुलाशी बोलता येईल, असा आदेश अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी राहुल डांगे यांनी दिला आहे.
याप्रकरणी पित्याने ऍड. विक्रांत शिंदे यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जदार हा पुण्यात वास्तव्यास आहे. तर त्याची पत्नी ही त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह रायपूर येथे वास्तव्यास आहे.
या दोघांचा घटस्फोटाचा दावा पुणे न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या 14 महिन्यांपासून अर्जदार पित्याला त्याच्या पत्नीने मुलाला भेटू दिलेले नाही. आपल्या मुलातदेखील करोनाची लक्षणे दिसली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र, पत्नी त्याच्या आरोग्याविषयी माहिती देत नाही. त्यामुळे मुलाची तब्बेत नेमकी कशी आहे? हे समजत नाही. त्यामुळे आपल्या मुलाबरोबर बोलता यावे यासाठी पित्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता, असे ऍड. विक्रांत शिंदे यांनी सांगितले.