नवी दिल्ली : जगासह देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे.
करोनावर अजूनपर्यंत तरी कोणताही उपाय सापडलेला नाही. अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. तर काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचे समोर आले होते. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्माने प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केले आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिनला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड-१९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ.अलोक चतुर्वेदी यांनी दिली.
पुढील महिन्याभरात या लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात होणार आहे. ही लस मानवी प्लाझ्मापासूनच तयार झाली आहे. त्यामुळे याचे निकाल महिन्याभराच्या आतच समोर येतील. या लसीसाठी प्रमाणपत्र घेणे आणि त्याच्या उत्पादनाच्या पूर्ण प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं डॉ. चतुर्वेदी म्हणाले.