हास्यदिन विशेष – हसताय ना? हासलंच पाहिजे…

डॉ. संतोष काळे 

हसरा चेहरा सर्वांना आवडतो. हसणारी आणि हसवणारी माणसं लोकप्रिय असतात. हसण्याचे शरीराला आणि मनाला अनेक फायदे मिळतात. हसण्यामुळे रोग दूर पळून जातात आणि अंतर्मनाला आपण खूश असल्याचा संदेश पोहोचतो. त्यामुळे माणसाची कल्पकता वाढते. कल्पक माणसे मन लावून काम करतात. ताणतणाव आणि नैराश्‍य दूर करण्यासाठी हसण्या-हसविण्यासारखा दुसरा मंत्र नाही. हे सर्व फायदे लक्षात घेऊनच दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने… 

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिवस (वर्ल्ड लाफ्टर डे) साजरा केला जातो. स्वतः हसणे आणि लोकांना हसविणे, हा या दिवसाचा संदेश आहे. मनमुराद हसण्यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहण्याबरोबरच मेंदूही शांत होतो, असे अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव, नैराश्‍य हसताना आपल्याला सतावत नाही. हसण्यामुळे नैराश्‍याबरोबरच आजारही दूर पळून जातात. याव्यतिरिक्‍त हसण्याचे माणसाला बरेच फायदे होतात. त्यामुळेच जीवनात सतत हसत-हसवत राहावे, असे सांगितले जाते.

जागतिक हास्य दिवस सर्वप्रथम मुंबईत 11 जानेवारी 1998 रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ करण्याचे श्रेय डॉ. मदन कटारिया यांच्याकडे जाते. हसल्यामुळे माणसाच्या अंतरंगात सकारात्मक विचारांची निर्मिती होते. हसण्यासाठी कारण लागत नाही. जेव्हा मनात येईल तेव्हा हसावे आणि इतरांनाही हसवावे. आजारात डॉक्‍टरसुद्धा आनंदी राहण्याचा सल्ला वारंवार देत असतात. कमी हसल्यामुळे नैराश्‍य आणि आजारांचा धोका वाढतो. हा संदेश देण्यासाठीच जागतिक हास्य दिनी जगातील अनेक शहरांत फेऱ्या, सेमिनार, हास्य संमेलने आदींचे आयोजन केले जाते.

भारतासह जगातील अनेक देशांत हल्ली दहशतवादी हल्ले वारंवार होतात. दहशतवादामुळे अनेक देशांतील नागरिक सतत भीतीच्या छायेखाली असतात. जगातील अनेक देशांत शांतता नावालाही शिल्लक उरलेली नाही. जगभरात शांतता, बंधुभाव आणि सद्‌भावना वाढीस लागावी, हाही जागतिक हास्य दिनाचा एक उद्देश आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा डॉक्‍टर नेहमी सांगतात, की हसल्यामुळे शरीर आणि मनाला निश्‍चित फायदा होतो. जितके जास्त आपण हसू तितक्‍या अधिक प्रमाणात सकारात्मक भावना मनात तयार होतात. सकारात्मक शक्तींचा संचार झाल्यामुळे आपण अनेक समस्यांवर सकारात्मक दृष्टीने विचार करून तोडगे काढू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांनी किमान वर्षाकाठी एखादा दिवस तरी आपल्यासाठी काढावा आणि मनमुराद हसावे, हसवावे, याच उद्देशाने जागतिक हास्य दिवस साजरा केला जातो.

आपल्याला जर तंदुरुस्त, निरोगी, खूश आणि दीर्घ आयुष्य हवे असेल, तर जेवढे शक्‍य होईल तेवढे हसायला हवे. अर्धे आजार तर केवळ हसण्यामुळेच दूर राहतात, असे म्हटले जाते. या जगात मानवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्याला हसता येत नाही. माणूस हसू शकतो आणि इतरांना हसवूही शकतो. हसण्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ तर होतोच; शिवाय चेहऱ्यावरील चमकसुद्धा वाढते. जगताना जिवंतपणाची जाणीव क्षणोक्षणी झाली, तरच त्या जीवनाला अर्थ असतो. हसरा चेहरा सर्वांना आवडतो. जो स्वतः सतत हसत असतो आणि इतरांनाही हसवतो, तो सर्वांना आवडतो. हसऱ्या व्यक्तींना अनेक मित्र मिळतात. त्यातून बंधुत्व आणि एकतेची भावना कधी वाढीस लागली, हे समजतसुद्धा नाही.

हसणे हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. आनंद झाल्यावर किंवा कुणाची थट्टामस्करी केली गेली, तर आपल्याला हसायला येते. हास्य ही एक सार्वत्रिक भाषा आहे. ही भाषा धर्म, जाती, पंथ, लिंग, वंश अशा भिंती मानत नाही. मानवतेच्या नात्याने सर्वांची एकजूट करण्याची शक्ती हसण्यात आहे. यातूनच आपल्याला नवे जग साकारायचे आहे. आजच्या काळात कदाचित हे खोटे वाटेल; परंतु जगात एकजूट घडवून आणण्याची ताकद केवळ हास्यरसात आहे. हसल्यामुळे आत्मा आनंदी होतो. हसल्यामुळे प्रत्येक व्यक्‍तीला आनंद मिळतो. एकत्रित हसल्यामुळे सामूहिक आनंदाची भावना निर्माण होते. हसल्यामुळे शरीरात ऑक्‍सिजनचा संचार अधिक प्रमाणात होतो आणि दूषित वायू वेगाने उत्सर्जित केले जातात. आजार आणि दुःखे यावरील रामबाण औषध हसणे हेच आहे.

अमेरिकेतील न्यूरो सायन्टिस्ट रॉबर्ट प्रोवाइन यांनी हसण्यावर बरेच संशोधन केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा आपण इतर व्यक्तींच्या सोबत असतो, तेव्हा आपण हसण्याच्या शक्‍यता 30 पटींनी वाढतात. एकटे असताना आपण तेवढे हसत नाही. त्यांच्या मते, माणूस हा सामाजिक प्राणी असल्याची हसणे ही पहिली खूण आहे. आपल्यात हसण्याच्या शक्‍तीचा विकासच इतर व्यक्तींना आपलेसे करून घेण्यासाठी झाला आहे, अशी प्रोवाइन यांची धारणा आहे. हतसण्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर जितका सकारात्मक परिणाम होतो, तेवढाच एकत्र हसल्यामुळे एकमेकांवरही सकारात्मक परिणाम होतो. कार्यालयांमध्येसुद्धा गंभीर वातावरण ठेवण्याऐवजी हास्यविनोद व्हायला हवेत, असे त्यांना वाटते. असे झाल्यास कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये संघभावनेचा उदय होतो आणि वातावरण चांगले बनल्यामुळे कर्मचाऱ्यांची कल्पनाशक्तीही वाढते. जेव्हा माणूस कल्पक बनतो, तेव्हा तो अधिक मन लावून काम करतो.

लंडन विद्यापीठाच्या प्राध्यापिका सोफी स्कॉट यांच्या मते, हसल्यामुळे आपण खुशीत असल्याचा संदेश आपल्या अंतर्मनाला मिळतो. त्यामुळे आपल्यात सुरक्षिततेची भावनाही वाढते. गूगल टॉकच्या एका संशोधनातील एका सत्रात प्रा. सॅंडी यांनी म्हटले होते की, ई-मेलवर संपर्क साधण्याऐवजी समोरासमोर बसून बोलण्याच्या कार्यपद्धतीला अधिक उत्तेजन देणे गरजेचे आहे. असे केल्यास संघभावना वाढीस लागून टीमची उत्पादकता 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढू शकते. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका टेरेसा एमाबाइल यांनी म्हटले आहे की, हसताना आपला मेंदू सर्वाधिक सचेतन आणि कल्पक बनलेला असतो.

हसण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. हसल्यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण चांगले राहिल्यास अनेक व्याधींपासून असणारा धोका टळू शकतो. हसल्यामुळे व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचारांची निर्मिती होते आणि व्यक्ती कधी निराश होत नाही. मानवी शरीरात छाती आणि पोट यांच्या मध्ये डायफ्राम असतो आणि हसताना तो कंप पावतो. त्यामुळे पोट, फुफ्फुसे आणि यकृताला मालिश होते. एवढेच नव्हे तर हसण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा असा की, हसल्यामुळे व्यक्तीची खरे बोलण्याची आणि तक्रारी स्पष्टपणे मांडण्याची शक्तीही वाढते. हसणे हा एक प्रकारचा व्यायामप्रकारच आहे. हसल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक स्नायूंना व्यायाम मिळतो.

“हसा आणि लठ्ठ व्हा’ असे म्हटले जात असले, तरी वस्तुतः हसल्यामुळे कॅलरीज नष्ट होतात आणि त्यामुळे स्थूलत्व कमी होते. एका संशोधनानुसार 15 मिनिटे हसल्यामुळे आपल्या शरीरातील 10 ते 40 कॅलरीज्‌चे ज्वलन होते. हसल्यामुळे शरीरात ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे रागावर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्‍य होते. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी हसणे खूप उपयुक्त ठरते. हसल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्‍वासही वाढत जातो. वैद्यकीय प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, दहा मिनिटे हसत राहिल्यास दोन तासांची गाढ झोप घेता येते. हसण्याचे हे सर्व फायदे लक्षात घेऊन आजच्या हास्य दिनी संकल्प करूया की, आपण एकत्र राहू आणि सगळे मिळून भरपूर हसू.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.