काँग्रेसच्या हातावर तुरी अन् राष्ट्रवादी-शिवसेनेची वाटमारी

राज्यातील राजकीय परिस्थितीवर आ. आशिष शेलारांचे इस्लामपूर येथे टीकास्त्र

येडेमच्छिंद्र येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ

इस्लामपूर (प्रतिनिधी) – माजी खासदार राजू शेट्टी यांची पिंजरा सिनेमातील मास्तर सारखी अवस्था झाली आहे. त्यात एका मोहा साठी मास्तर तुणतुणे वाजवू लागला होता, तर आता एका विधानपरिषदेच्या जागे साठी राजू शेट्टी हातात तुणतुणे घेऊन अडत आणि व्यापाऱ्याची वकिली करू लागले आहेत, अशी बोचरी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. 

राज्य सरकारच्या बाबतीत ते म्हणाले,” काँग्रेसच्या हातावर तुरी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेची वाटमारी अशी सध्या राज्यात परिस्थिती आहे.आता सर्वात जास्त लक्ष्मी दर्शन महाविकास महाआडीमधील नेत्यांना होत आहे.

येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) येथे भारतीय जनता किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आ.आशिष शेलार बोलत होते. जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे,माजी कृषीमंत्री आ. सदाभाऊ खोत,आ.गोपीचंद पडळकर, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक,राज्य कार्य समिती सदस्य सम्राट महाडिक उपस्थित होते.

आ. शेलार म्हणाले, सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या मराठी चित्रपटात एका मोहापायी एका आदर्श शिक्षकाला तमाशाच्या फडात तुणतुणे घेऊन उभे राहावे लागते. तशी अवस्था शेट्टी यांची झाली आहे. विधानपरिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजूने तुणतुणे घेऊन उभे आहेत. ते त्यांची वकिली करत आहेत.

आ.शेलार म्हणाले,” शेतकऱ्यांना भ्रमिष्ट केले जात आहे. त्यांचे प्रबोधन हवे. देशात मोठे महायुद्ध पुकारले आहे की काय ? असे वातावरण काही मूठभर लोक करीत आहेत. फुले, आंबेडकर, शाहू यांची नावे घेऊन राजकारण करणारे महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या विचाराच्या विरोधात कृती करत आहेत. महात्मा फुलेंनी जे चिंतन केले ते आम्हीं कृतीत आणले.शेतकऱ्यांना गुलामगिरी तून बाहेर काढले.व्यापारी तत्वावर शेती करायला हवी हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे तत्व होते हे पाळत नाहीत शेतकरी विरोधात की बाजूने हे सरकार आहे हा प्रश्न पडतो.

माजी मंत्री खोत म्हणाले,” क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मातीतून पहिला टप्पा सुरवात होत आहे. या मातीने देशाला स्वातंत्र्य दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर क्रांतिसिंहानी लढा दिला. गोरे गेले आणि काळे आले. शेतकरी विरोधी नीती तीच राहिली.अत्यावश्यक दराच्या कायद्याने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण झाले. सर्व पिकवलेली पिके अत्यावश्यक कायद्यात आली. नेहरूंनी शेतकऱ्यांना विरोधी निर्णय घेत शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवले होते. या नव्या विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले.”

माजी आ.सुरेश हाळवणकर म्हणाले,” शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ७० वर्षानंतर
शेतकरी हिताचे कायदे झाले आहेत. शेतकऱ्यांचे शोषण करणारे वजन काटे आहेत. कारखान्यात ऊस ट्रक गेला की ताबडतोब पावती द्या.मग भानगड करता येणार नाही. शेतकऱ्यांची लूट चालली आहे ती थांबवायला हवी.”

आ. पडळकर म्हणाले,” मेंढरांचे नेतृत्व लांडग्यांनी करावे असे स्वतःला समजून काही जण स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजत आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधी राहून लुट करणारे आतां नव्या कायद्याला विरोध करीत आहेत. किसान कार्डच्या माध्यमातून मदत केली आहे. कोरोनाच्या काळात मोठा निधी दिला. केंद्र सरकारने इतके दिले तर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना, बारा बलुतेदाराना काय दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले तर आमचे दुकान बंद होईल या भीतीने सर्व विरोधक केंद्र सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. विरोधी पक्षांचे धोरण प्रश्न मिटवायचे नाहीत. ते नेहमी तेवत ठेवायचे.वेगवेगळ्या प्रश्नांवर संघटना तयार करायच्या. नेते बनवायचे अन् त्यांना पोसत बसायचे. हे षड्यंत्र मुळापासून संपवायचे आहे.”

भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक प्रास्ताविक करताना म्हणाले,” काही विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी ही यात्रा आहे.’

माजी आमदार भगवानराव साळुंखे,भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील ,जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमित ओसवाल, विक्रम पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, विजय कुंभार,सागर खोत, सुनील खोत उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून यात्रेची सुरवात झाली.

विश्वासघाती राजे असा इतिहास लिहला जाईल..!

शरद पवार जे बोलतात त्याचा नेहमी उलटा अर्थ असतो. त्यांच लय मनावर घेवू नका. मार्केट कमिट्या
बंद झाल्या पाहिजेत. हमाल, तोलाई माफ झाली पाहिजे असे पवारांनी आत्मचरित्रात लिहले आहे. जाणत्या राजाने खोटे बोलू नये. तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते नव्हे तर विश्वासघाती व खोटारडे राजे होता. असा इतिहास लिहला जाईल असा टोला आ.सदाभाऊ खोत यांनी लगावला.

त्यांना बाहेर पडु देणार नाही..!

अडत व दलालांचे समर्थन करणारे अंबानीच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गेले. त्यांना हात हालवत परत
यावे लागले. अंबानीने शेतकरी धोरणाला नख लावण्याचे काम केले तर तुम्हाला मुंबईत येण्याची गरज नाही. मी मुंबईत सर्व ताकद देवून उभा आहे. त्यांना बाहेर पडु देणार नाही, अशी ग्वाही आ.आशिष शेलार यांनी दिली.

पैशाचा व्यवहार नसल्याने बदल्या थांबल्या..!

कोणतेही काम करताना राज्यसरकार मधील नेते कोरोना आहे म्हणतात. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी लगेच मिटिंग घेतली जाते. आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत. त्यांचा पैशांचा व्यवहार झाला नसल्याने बदल्या झाल्या नसतील असा आरोप आ.गोपिचंद पडळकर यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.