जामखेड : आमदार रोहित पवार प्रशासकीय अधिकारी समवेत खर्डा येथील टंचाईचा दौर्यावरून परतत असताना त्यांनी राजुरी गावातील स्वस्थ धान्य दुकानास भेट दिली यावेळी दुकान बंद होते, दुकानदाराकडे दुकान का बंद आहे याची विचारणा केली असता चावी नसल्याची खोटी सबब सांगत मग्रुरपणे उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावेळी दुकानाचे कुलूप तोडण्यात आले. यावेळी दुकानातील शिल्लक मालाचा तपशील व परिस्थिती पाहता त्यांनी दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी केली व प्रशासनाला तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
आमदार रोहीत पवार यांना राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या याबाबत टंचाई दौऱ्यानिमित्ताने खर्डा येथील मोहरी तलावातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलीत स्वस्त धान्य दुकान गाठले यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार विशाल नाईकवाडे, पुरवठा अधिकारी नितीन बोरकर उपस्थित होते. यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी रामभाऊ राळेभात यांना बोलावून घेतले त्यांना दुकान उघडण्यात सांगितले असता त्यांनी चावी नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली.
आमदार रोहीत पवार यांनी सदर धान्य दुकानाचे कुलूप तोडण्यास सांगितले व दुकानची पाहणी केली असता दुकानात धान्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. यावेळी संबंधित दुकानदाराने आमदार रोहित पवार , प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. आ. रोहीत पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना धान्य मिळणे आवश्यक असताना तालुक्यातील दुकानदार अशा पध्दतीने वागत असतील तर सर्वच दुकानांची तपासणी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
महसुलच्या पथकाने आमदारांचा ताफा गेल्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका पुरवठा अधिकारी नितीन बोरकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील लटके व कर्मचारी यांनी हाती घेतली. या तपासणीचा अहवालात एप्रिल व मे महिन्याचा धान्य दुकानदार शासनाकडून गहू १०६.५० क्विंटल, तांदूळ १५१.५० क्विंटल, साखर१.९० क्विंटल अंत्योदय लाभार्थीसाठी देण्यात आली होती त्यापैकी धान्य वाटप केल्यानंतर दुकानात सहा क्विंटल गहू, तांदूळ १५.७९ क्विंटल, व अंत्योदय साखर ७५ किलो साठा जास्त आढळून आली त्यानुसार धान्य दूकानदाराने पॉस मशीनवर स्वताच्या अंगठ्याने पावत्या काढून लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले असून लाभार्थ्यांना वंचीत ठेवले असल्याचा अहवाल दिला आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी १० डिसेंबर रोजी तपासणी केली असता त्यांनी उपस्थित केलेल्या शंकाची पूर्तता केली नाही, धान्य दुकानात भेट वही नाही, वजनकाटा प्रमाणीत नाही, माहीतीफलक व दरपत्रक नाही, संदर्भ रजिस्टर, लाभार्थी यादी धान्य पोहच पंचनामा ठेवलेला नाही, दुकानात अस्वच्छता, धान्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले आहे त्यामुळे घुशीचा व उंदराचा वावर यामुळे ठिकठिकाणी उकीर काढलेले दिसून आले आहे,दुकानाचे प्राधीकारपत्र नुतनीकरण केलेले नाही व ते दुकानात ठेवले नाही तसेच दुकानातील धान्याची वर्गवारी करून थप्पी लावण्यात आली नाही अस्ताव्यस्त व एकत्रित लावलेली आहे अशा त्रुटी अहवालात नमूद केल्या आहेत.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी धान्य दुकानदार शहाजी राळेभात यास तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटीचा खुलासा ४८ तासात न केल्यास कारवाई करण्यात येईल असे असे पत्र दिले आहे. आमदार रोहीत पवार यांनी स्वस्त धान्य दुकानदारा बाबत कडक धोरण घेतले असल्याने तालुक्यातील दुकानदाराची पाचावर धारण बसली आहे.