सातारा: कोरेगाव मतदारसंघात आ. महेश शिंदेंची दमदार एन्ट्री

ल्हासुर्णे, सातारारोड, देऊर, पेठ किन्हई ग्रामपंचायतीत धक्कातंत्र

कोरेगाव – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ल्हासुर्णे, सातारारोड, देऊर, पेठ किन्हईसह प्रतिष्ठेच्या 30 ग्रामपंचायतींमध्ये “दे धक्का’ तंत्र अवलंबत आ. महेश शिंदे यांनी दमदार “एन्ट्री’ केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीत पहिला निकाल ल्हासुर्णे ग्रामपंचायतीचा आल्यानंतर आ. महेश शिंदे यांच्या दमदार एन्ट्रीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांच्या गावातच सत्तेला सुरुंग लावत आ. महेश शिंदे यांनी 11 पैकी 8 जागांवर मोठा विजय मिळवला. ल्हासुर्णे पाठोपाठ मंगळापूर, तांदुळवाडी, बोरजाईवाडी, पेठ किन्हई, रेवडी, देऊर, गोडसेवाडी, कठापूर, गोगावलेवाडी, अंबवडे सं. वाघोली, नलवडेवाडी या ग्रामपंचायतींचेही निकाल आ. महेश शिंदे यांच्या बाजूने लागले.

कोरेगाव तालुक्‍यातील सर्वात मोठ्या सातारारोड-पाडळी ग्रामपंचायतीत आ. महेश शिंदे गटाने 17 पैकी 15 जागा जिंकत जबरदस्त विजयाची नोंद केली. देऊरमध्येही 11 पैकी 8 जागा पटकावत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला. कोरेगाव मतदारसंघातील मोठ्या ग्रामपंचायती जिंकत आ. महेश शिंदे यांच्या गटाने तालुक्‍याच्या राजकारणात आपलाच बोलबाला असल्याचे सिद्ध केले आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सातारा व खटाव तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींवर आ. महेश शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. त्यामध्ये संगम माहुली, कोडोली, चिंचणेर वंदन, वनगळ, वाढे, तासगाव, खटाव तालुक्‍यातील जाखणगाव, नेर, दरुज, निढळ, जांब या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तेथील सत्ता काबीज करत आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर मोठी मात केली आहे.

करोना काळात आ. महेश शिंदे यांनी केलेल्या दमदार कामाचीच ही पोचपावती असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांमधून व्यक्‍त केली जात आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सूत्रबद्ध प्रचारयंत्रणा राबवून, ग्रामपंचायतींमध्ये असलेली प्रस्थापितांची सत्ता उलथवून टाकत आ. महेश शिंदे यांनी दमदार कामगिरी नोंदवली आहे. या निकालाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

 ल्हासुर्णेत प्रतिष्ठेच्या लढतीत दिसली ताकद
आ. शशिकांत शिंदे यांचे गाव समजल्या जाणाऱ्या ल्हासुर्णे ग्रामपंचायतीत आ. महेश शिंदे गटाने 8 विरुद्ध 3 अशी बाजी मारली. विकासाला साथ देण्याच्या त्यांच्या आवाहनाला मतदारांनी साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. शशिकांत शिंदे यांना त्यांच्या गावातच धोबीपछाड दिल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.