आ. शशिकांत शिंदे किंवा अमित कदम, सुनील माने, संग्राम बर्गे की रोहित पवार?

सातारा व कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण? शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाने हालचालींना वेग

सम्राट गायकवाड

सातारा  –  राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेशांचा ओघ सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळती लागण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने हालचाली गतीमान केल्या असून विशेषत: सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून कोणत्या उमेदवाराला रणांगणात उतरावयचे, असा पेच पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे. दहा वर्षापूर्वी तत्कालिन जावळी- महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तत्कालिन आमदार शशिकांत शिंदे यांना तो मतदारसंघ सोडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. तेव्हापासून आ. शिंदे कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करित आहे. मात्र, आ. शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत विरोध वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आणि आता बदलत्या परिस्थितीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याविरोधात तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी आ. शिंदे यांना सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून उतरविण्याची रणनिती आखण्यात येत आहे.

अशा वेळी कोरेगाव मतदारसंघातून खा. शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि खा. उदयनराजे यांचे कट्टर समर्थक संग्राम बर्गे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊशकते. त्याचबरोबर राष्ट्रवादीने “प्लॅन बी’ देखील तयार ठेवला आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगावातूनच लढण्याचा आग्रह कायम ठेवला तर माजी आमदार कै. जी. जी. कदम यांचे चिरंजीव अमित कदम यांची भाजपमधून राष्ट्रवादीत घरवापसी होऊ शकते. सध्या भाजपमध्ये असणाऱ्या कदम यांनी यापूर्वीच सातारा- जावळीतून निवडणूक लढविण्याची प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. मुंबई व सातारा येथे मेळावा घेऊन मतदारांच्या भावना जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विशेषत: साताऱ्यातील मेळाव्यात खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणा पाहता अमित कदम यांना राष्ट्रवादीकडून सातारा- जावळीच्या रणांगणात उतरविण्यात येऊ शकते.

दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सुनील माने, अमित कदम आणि संग्राम बर्गे तीन नावांना राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. यापैकी सुनील माने व अमित कदम यांनी आमदार होण्याची इच्छा कधीही लपवून ठेवली नव्हती. आठ वर्षापूर्वी झालेल्या सातारा- सांगली विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुनील माने यांना आमदार होण्याची संधी जवळपास चालून आली होती. मात्र, ऐनवेळी एका ज्येष्ठ नेत्याच्या आग्रहाखातर प्रभाकर घार्गेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. तेव्हापासून आमदारकीची संधी हुकल्याची सल माने यांच्या मनात कायम होती. आता नेमकी संधी माने यांना चालून आली आहे. मात्र, यंदाच्या संधीत मोठा संघर्ष माने यांना करावा लागणार आहे. पक्षांतर्गत नाराज गट, माजी मंत्री शालिनीताई पाटील आणि कै. शंकरराव जगताप गटाची सहमती माने यांना घ्यावी लागणार आहे.

त्याचबरोबर माने हे कोरेगाव तालुक्‍यातील असले तरी ते कराड उत्तर मतदारसंघातील मतदार आहेत. तसेच महेश शिंदेंच्या रूपाने आणि आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतरामुळे मतदारसंघात भाजप मजबूत होणार आहे. पार्श्‍वभूमीवर माने हे कितपत आव्हान उभा करू शकतात, हा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

अशा वेळी पुन्हा एकदा रोहित पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. पवार यांनी विधानसभेसाठी कर्जत- जामखेड मतदारसंघ निवडला आहे. मात्र, त्या मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे प्रतिनिधित्व करित आहेत. या पार्श्‍वभूमीवर आणि राज्यात राष्ट्रवादी घायाळ होत असताना कर्जत- जामखेडमधून उमेदवारी करणे जोखमीचे ठरणार आहे. त्यामुळे ऐनवेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांचीदेखील उमेदवारी जाहीर होऊ शकते. पवार कुटुंबीयांचे मूळ गाव कोरेगाव तालुक्‍यातील नांदवळ आहे. या मुद्दयाचा राजकीय लाभ यापूर्वी खा. शरद पवार यांना 2009 ची माढा लोकसभा निवडणूक लढविताना झाला होता. मात्र, तेवढा लाभ रोहित पवार यांना होईल का, हादेखील प्रश्‍न आहे.

खासदार उदयनराजेंची भूमिका निर्णायक 
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी सातारा, कराड- उत्तर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघांत काही प्रमाणात घायाळ होणार आहे. त्याचबरोबर आ. शिवेंद्रसिंहराजेंचे राजकीय वजनदेखील भविष्यात वाढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत खा.उदयनराजेंपुढे सातारा- जावळीतून अमित कदम तर कोरेगावातून संग्राम बर्गे यापैकी एका समर्थकाला आमदार करण्याची संधी आहे. त्यामुळे खा. उदयनराजे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, हे देखील पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)