आ. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच राज्यातून कॉंग्रेस हद्दपार

कराड – राज्यात 2014 पूर्वी सत्तेमध्ये असलेले कॉंग्रेसचे आघाडी सरकार हे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे राज्यातून हद्दपार झाल्याची टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली. अतुलबाबांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणला कोट्यवधींचा विकासनिधी उपलब्ध झाल्यामुळे आगामी निवडणुकीत अतुलबाबा विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास कोळेवाडी, ता. कराड येथे आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यात मोहिते यांनी व्यक्त केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ना. अतुल भोसले, संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, माजी संचालक श्रीरंग देसाई, म्हाडाचे संचालक मोहन जाधव, सचिन पाचपुते, तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष संजय पवार, दादासो देवकर, डॉ. अनिल चिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहिते म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण यांना अपघाताने मुख्यमंत्रीपद मिळाले. 2014 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघात निधी टाकला. माझ्या सहकार्यामुळेच त्यांना त्यावेळी आमदारकी मिळाली. परंतु आमदार झाल्यावर चव्हाण यांनी या मतदारसंघाकडे ढूंकूनही पाहिले नाही. ते आमदार झाले, पण राज्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली. आमच्या सारख्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हणून आम्हीही त्यांना सोडण्याचा योग्य निर्णय घेवून मोकळे झालो. सध्या तालुक्‍यातील कॉंग्रेसने 2014 पूर्वी केलेल्या विकासकामांचे फ्लेक्‍स प्रत्येक गावांमध्ये लावलेले आहेत. पण त्यांनी गेल्या पाच वर्षातील लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. डॉ. सुरेश भोसले म्हणाले, केंशेतीसाठी सिंचन योजना सक्षम करणे, गावागावांमध्ये पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा असेल. तसेच रोजगार निर्मितीवरही आमचा भर असेल. विकासाची दृष्टी असणाऱ्या अतुलबाबांना तुम्ही सर्वांनी साथ द्या, ते या भागाचा कायापालट करतील.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भाजप सरकारने स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी परिसरातील पूरसंरक्षण भिंत बांधण्यासाठी मंजूरी देऊन त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. लवकरच कोळेवाडीतील धनगर समाजाच्या मंदिरासाठीच्या कामासाठी निधी उपलब्ध केला जाणार असून कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. यावेळी या विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)