आ. गोरेंच्या गुगलीने माढ्यात पुन्हा ट्‌विस्ट

राजकीय तर्कवितर्कांना उधाण; म्हसवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा

म्हसवड – लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म फक्त आपणच पाळायचा का? असा मुद्दा उपस्थित करत भाजपकडून उभे असलेले रणजितसिंह निंबाळकर हा माझ्या घरातला माणूस असल्याच सुतोवाच जयकुमार गोरे यांनी केले. त्यांच्या या गुगलीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माण तालुक्‍यातील कॉंग्रेसला जिथे जिथे अडवता येईल तिथ तिथं राष्ट्रवादीने अडवण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभेला याच राष्ट्रवादीला मदत करून आघाडीचा धर्म फक्त आपणच पाळायचा का? असा मुद्दा उपस्थित करत भाजपकडून उभे असलेले रणजितसिंह निंबाळकर हा माझ्या घरातला माणुस असल्याचे सुतोवाच करून आ. जयकुमार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात नवीन ट्‌विस्ट आणलीय.

सध्या होत असलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराचे काम करायचे आघाडीचा धर्म पाळायचा का? नाही पाळायचा यासाठी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथील आनंदीबाई दोशी सांस्कृतिक भवनात कार्यकर्त्यांची बैठक घेवून मते जाणून घेतली. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, सौ. वैशाली लोखंडे, सौ. शोभा लोखंडे, इश्‍वरा खोत, माजी नगरसेवक बी. एम. अबदागिरे, सुरज ढोले आदी उपस्थित होते. यावेळी आ. गोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची हा सद्या यक्ष प्रश्‍न आपल्या सर्वांसमोर आहे. कारण इकडे विहीर आहे तर इकडे आड आहे. त्यामुळे कशात तरी उडी मारावीच लागणार आहे, पण पाणी कशात आहे हे बघुनच उडी मारली पाहिजे, अशी गुगली आ. गोरे यांनी टाकली.

जयकुमारला थांबवणं सोप नाही हे लक्षात आल्यावर बारामतीकरांनी आमच्याच घरात भांडण लावले. पण आमच्या गड्यालाही कळले नाही कि राष्ट्रवादी काय आहे. पण आता त्यांनाही कळुन चुकले आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मदत करायची, आघाडीचा धर्म पाळायचा का? भाजपच्या उमेदवाराला मदत करायची हे कार्यकर्त्यांनी ठरवावे. कारण गेल्या निवडणुकीत आपण आघाडीचा धर्म पाळला होता मात्र सर्वच निवडणुकांत आपल्याला राष्ट्रवादीनेच विरोध केला. मग आघाडीचा धर्म आपणच का पाळायचा? असा सवाल माझ्यासह कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणुकीत कोणाला मदत करायची यासाठी मी गावागावातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार असल्याचेही गोरे म्हणाले. यावेळी म्हसवड व पंचक्रोशीतील कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.