वाई शहरासह तालुक्यात बोलबाला; चौकाचौकात, महत्वाच्या ठिकाणी नागरिकांकडून वाचन
वाई (प्रतिनिधी) – दरवर्षी 29 ऑक्टोबरला उत्साहात साजरा होणारा आ. मकरंद पाटील यांचा वाढदिवस यंदा करोनामुळे साजरा न करण्याचे आवाहन खुद्द मकरदंआबांनीच दिले होते. त्यामुळे आपल्या लाडक्या जननायकला प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याने वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील जनता व आमदारप्रेमींची काही अंशी निराशा झाली होती. आ. पाटील हे लोकांसाठी 24 तास “रिचेबल’ असतात; परंतु वाढदिनी सर्वाना मिळणारी आबांची गळाभेट दैनिक “प्रभात’ वाढदिवस विशेषांकाच्या माध्यमातून घडवून आणली. त्यामुळे आबांच्या चाहत्यांनी “प्रभात’चे कौतुक व अभिनंदन केले.
करोना संसर्गामुळे रद्द झालेल्या आबांच्या वाढदिवसाची कसर “प्रभात’च्या विशेषांकामुळे भरून निघाल्याचा आनंद वाचकांसह वाई शहर व संपूर्ण तालुक्यामध्ये व्यक्त करण्यात येत होता. प्रभातच्या विशेषांकाचे वाचन नागरिक ठिकठिकाणी करताना दिसत होते. आपल्या लाडक्या नेत्याचे भरभरून कौतुक करून “प्रभात’च्या अंकाला दिलखुलास दाद देत होते.
वाई एसटी स्टॅंड परिसर, रिक्षा स्टॉप, हॉटेल, भाजी मंडई, चहाच्या टपऱ्या, किसनवीर चौक, धर्मपुरी चौक, रविवार पेठ व शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लोक या विशेषांकाचे अवलोकन करताना दिसत होते.
नगरसेवक, भाजी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, रिक्षावाले, प्रवासी, हॉटेलमालक, नागरिक चहाच्या घोटाबरोबरच आमदारांच्या कार्यावरील लेख, फोटो पहात “प्रभात’च्या विशेषांकांचा आस्वाद घेत होते. शेंदुरजणे, पांडे, बोपेगाव, केंजळ, वेळे, पसरणी, मेणवली, बावधन, अन्य प्रमुख गावे, वाईच्या पश्चिम भागातील गावांमधील चावड्यांवर “प्रभात’च्या विशेषांकाचे सार्वजनिक वाचन करण्यात येत होते. आबांना जणू प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद नागरिकांना होत होता.