आ. शंभूराज देसाई यांचा विरोधकांना पाटणमध्ये इशारा

शासनाकडून पाटणच्या नगरपंचायतीवर कारवाई करण्याची वेळ आणू नका

सणबूर – पाटण शहरातील विकासाच्या कामांमध्ये राजकारण करुन विकासकामाकरीता आवश्‍यक असणारे ठराव न देण्याची पाटण नगरपंचायतीची भुमिका पाटण शहराच्या विकासकामांना घातक आहे. राजकारणासाठी आडमुठेपणा करणाऱ्या पाटणच्या नगरपंचायतीवर शासनाकडून कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा आ. शंभूराज देसाई यांनी दिला. आडमुठे धोरण राबवून विकासकामांचे ठराव अडविण्याचे अधिकारात बसत नाही. तरी तुमचे अधिकार सांगत असला तरी शासनाचे अधिकार वापरुन चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या नगरपंचायतीवर कारवाई करण्याचे अधिकारही शासनाला आहेत, ती वेळ येवू देवू नका असा स्पष्ट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.

आमदार शंभूराज देसाई यांच्या स्थानिक विकास निधीमधून मौजे रामापूर येथील वॉर्ड क्रं.14 मध्ये अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर बांधकाम करणे व प्रभाग 17 मध्ये आर. सी. सी. गटर बांधणे या कामांच्या भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या दोन्ही कामांसाठी त्यांनी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पंचायत समितीच्या माजी सभापती मुक्ताबाई माळी, शिवदौलतचे संचालक अशोकराव पाटील, कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेजवळ, बबनराव भिसे, ऍड. तानाजीराव घाडगे, माजी जिल्हा परीषद सदस्य बशीर खोंदू, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, नगरसेविकामनिषा जंगम, सलीम इनामदार, शफीभाई सातारकर, शंकर कुंभार, अरुण घोणे, रामचंद्र पाटील, बबनराव माळी, शंकर पाटील, गुरुलिंग जंगम, बबनराव पवार, अशोक नायकवडी, महादेव खैरमोडे, हनिफ सातारकर, मुसाभाई इनामदार, आर्शफ खोंदू, इब्राहिम सातारकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रामापूर येथील नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. देसाई म्हणाले, पाटण शहरात आज भूमिपुजन केलेली दोन्ही कामे ही मला आमदार म्हणून प्रतिवर्षी मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीतील आहेत. जम्मु काश्‍मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघातकी भ्याड हल्ल्यामुळे हे कार्यक्रम शुक्रवारी रद्द करण्यात आले होते. मात्र आपल्या अगोदर कोणीतरी येवून येथे भुमिपूजनांचे कार्यक्रम घेतल्याचे समजले. ज्यांनी ही भुमिपूजने घेतली त्यांच्या कामांना मंजुरी नाही. मी मंजुरीचा आदेश आणि या कामांचे कार्यारंभ आदेशच घेवून आलोय. दिखावा करणाऱ्यांना आणि बिनकामाचे राजकारण करणाऱ्यांकडे आपल्याला वेळ नाही. आपण विकासाचे काम करतोय ते आपण करीत रहायचे. नगरपंचायतीची निवडणूक होऊन दोन वर्षे झाली.

पाटणला किती तास पाणी येते असा उपस्थितांना सवाल करीत ते म्हणाले, पाटणला केवळ अर्धा तास पाणी मिळते म्हणून मी नगरपंचायतीच्या निवडणुकी आधी पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या दुरुस्तीच्या कामांकरीता सुमारे 46.57 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला. त्याचे काम या बहाद्दरांना करता आले नाही. नगरपंचायतीचे काम मंजूर असते तर त्यांचे नेते आले असते ना भुमिपूजन करायला. पण ते आले नाहीत यावरुनच त्यांचे पितळ उघडे पडले आहे, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.