आ. जयकुमार गोरे भाजपच्या वाटेवर?

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भेटीने चर्चेला उधाण 
नगर –
ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा असतानाच बुधवारी माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विखेंची भेट घेतल्याने आता आमदार गोरेंचाही भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. दरम्यान, गत काही दिवसांपासून आमदार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरु असतानाच विखे-पाटील आणि गोरे यांच्या आजच्या भेटीने या चर्चेचा आणखी उधाण आले आहे.

जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार गोरे यांनी बुधवारी विखे यांची भेट घेतली. संगमनेरमध्ये या दोघांची भेट घेतल्यानंतर दोघेही एकाच वाहनातून पुढील प्रवासाला रवाना झाले. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विखे यांची संगमनेरमध्येच भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार यांनी विखे यांचा 1 जूनला भाजप प्रवेश असल्याची माहितीही दिली होती. विखेंना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असे सूचक विधान सत्तार यांनी केले होते.

लोकसभा निवडणुकीत गोरे यांनी महायुतीच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर विखे यांच्यासोबत तेही भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. आता सत्तार आणि गोरे यांनी उघडपणे विखे यांची भेट घेतली असली तरी अन्य नावांना अद्याप दुजोरा मिळत नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×