आ. जयकुमार गोरे यांचा राष्ट्रवादीला सुरूंग

नागनाथ डोंबे

भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनाच मतदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

म्हसवड – माढा लोकसभा मतदार संघात मोठी उलथापालथ झाली असून माण तालुक्‍याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडीत घेण्यात आलेल्या तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आघाडीचा धर्म न पाळण्याचा निर्णय होऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनाच मतदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मेळाव्यातील उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी हात वर करून निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

संपूर्ण राज्यात पर्यायी देशात गाजलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील राजकीय घडामोडी ह्या निष्ठेच्या राहिल्याच नाहीत. कारण ज्यांनी सत्तेत पक्ष असताना व सत्तेत नसताना दोन्ही राजकीय पक्षाचे निष्ठेने काम करून पक्ष वाढवला त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बोडक्‍या राजकारणामुळे तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार खावा लागत आहे. याला एकमेव कारण ठरले आहे ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना आमदार जयकुमार गोरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी देशमुख यांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्रे दिल्याचे दिसून आल्याने आमदार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करून टाकल्याचे दिसून येत आहे.
याला कारणही तसेच आहे.

माढा लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार असलेले रणजितसिंह निंबाळकर हे आमदार गोरे यांचे जिवलग मित्र समजले जातात. तर दुसरे राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे हेही आमदार गोरेचे मित्रच आहेत. या सर्व राजकारणाआडचे मित्र असलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील डझनभर नेत्यांना माणचे आमदार गोरे यानी काही दिवसांपूर्वी बोराटवाडीत त्यांच्या निवासस्थानी डिनरपार्टी दिली होती. या पार्टीनंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वश्रुत आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच आघाडीचा धर्म न पाळण्याचा सुर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधून येत होता. मात्र काल झालेल्या आमदार गोरे यांच्या बोराटवाडीत घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हात वर करून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याने माढ्याच्या राजकारणात पुन्हा आमदार गोरे यांनी उलथापालथ करून टाकल्याचे दिसून येत आहे.

आमदार गोरे यांनी या निवडणुकीची रणनिती निवडणुकीपूर्वीच आखल्याचे बोलले जात होते. कारण कॉंग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागे भाजप प्रवेशाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र ते आघाडीचा धर्म न पाळण्याच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक मेळाव्यात मी कॉंग्रेसचाच आहे. परंतु या निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळण्याचा पावित्रा घेत असल्याचे दिसत होते. त्यामुळे आमदार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात मोठा दबावगट निर्माण केला होता. अशातच राजकीय अस्तित्वासाठी भाजपबरोबर जुळते घेण्याची शक्कल लढवत डिनरपार्टीत रणजितसिंहांना भाजपमध्ये पाठवून त्यांनी आपला स्वत:चा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर केल्याचे राजकीय जाणकार सांगताहेत तर दुसरीकडे तालुक्‍यातील भाजपचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई हे दोन आमदारकीचे दावेदार असलेल्या नेत्यांवरही कडी केल्याचे बोलले जात आहे.

तर नुकताच तालुक्‍यात मोठा गट असलेले नेते त्यांचेच विरोधक बंधू शेखर गोरे यांनीही भाजपच्या उमेदवाराला बाहेरून पाठिंबा दिल्याने त्यांच्याही भाजप प्रवेशाच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे माण तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे एकमेव नेते संजयमामा शिंदे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे डॉ. दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई, कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख, सह दिग्गज नेते मंडळीही भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.