आ. राजळे यांच्याकडून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी

योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

शेवगाव – जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी मृत साठ्याच्या मायनस पाचवर पोहचली असल्याने आज आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव व पाथर्डी नगर परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत शेवगाव पाथर्डीसह 54 गावच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची पहाणी केली. यावेळी तासागणीक मागे सरकणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज रहाण्याच्या सूचना आ. राजळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जायकवाडी धरणातून मराठवाडयातील औरंगाबाद व नगर जिल्हयातील अनेक गावांना व औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो. यंदा धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच भंडारदरा, मुळा, दारणा, गंगापूर आदी वरच्या भागातील धरणेही भरली नाहीत. त्यामुळे शेवगाव- पाथर्डी योजनेवर अवलंबून असलेल्या गावांची तहान कशी भागवायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संभाव्य टंचाईवर मात करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी आज आ. राजळे यांनी जुने दहिफळ येथील पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल व पाण्याची पहाणी केली.

यावेळी शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, शहर टाकळी योजेनेचे अध्यक्ष पंडीतराव भोसले, शेवगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, नगरसेवक रमेश गोरे, रमेश हंडाळ, पं. स. सदस्य सुभाष केकाण, गटनेते सुनील ओव्हळ, शेवगावचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, उपअभियंता आर. एम. सानप, योजनेचे ठेकेदार राहुल देशमुख आदी उपस्थित होते.

जायकवाडी धरणाची पाणी पातळी ओसरल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलपासून धरणाचे पाणी सुमारे तीन किलोमीटर मागे सरकले आहे. त्यामुळे चर खोदून जॅकवेलपर्यंत नैसर्गीक उताराने पाणी आणण्यात आले आहे. साधारणतः आणखी सात आठ दिवस नैसर्गिकरित्या चराद्वारे असे पाणी मिळू शके. मात्र त्यानंतर पाणी टंचाईचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या हॉर्स पॉवरच्या मोटरीच्या सहाय्याने धरणातील पाणी उचलून चरात टाकावे लागणार आहे.

पाथर्डी, शेवगांव योजनेतील समाविष्ठ 54 गावांकरीता दररोज एक कोटी 30 लाख लिटर पाण्याची आवश्‍यकता लागते. एवढा मोठा उपसा करण्यासाठी कोणतेही पंप बंद पडू नयेत. बंद पडलेल्या पंपासाठी पर्यायी पंपाची उपलब्धता असावी, अशा सूचना आमदार राजळे यांनी दिल्या. तसेच संभाव्य व आकस्मीक खर्चासाठीचा अहवाल तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगून शासन स्तरावरुन अशा खर्चासाठीचा निधी उपलब्ध केला जाईल, असा दिलासाही त्यांनी दिला. शेवगांव शहराच्या काही भागात सध्या अकरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने धरणातून 24 तास पाणीउपसा सुुरू ठेवून हा कालावधी चार ते पाच दिवसांवर आणता येईल अशी अपेक्षा राजळे यांनी व्यक्त केली. यावेळी शेवगांव शहरातील अनेकांची थेट मेन लाईनलाच कनेक्‍शन आहेत. काही प्रतिष्ठीत व्यापारी, राजकारणी मंडळी यांच्या घरात दोन- दोन कनेक्‍शन अनाधिकृत असल्याने शेवगांव शहरात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारी काही पदाधिकाऱ्यांनी आ. राजळेंकडे केल्या. त्यावर आता टंचाई आहे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी पालिकेने प्रयत्न करुन प्रसंगी कडक धोरण अवलंबवण्याची गरज असल्याच्या सूचना आ. राजळेंनी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.