माढ्यात आ. जयकुमार गोरे ठरले राजकारणातील चाणक्‍य!

शेखर गोरे “सबसे बडा खिलाडी’, माणमधील मताधिक्‍क्‍याने भाजपचा विजय सुकर
नागनाथ डोंबे
म्हसवड – कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हात उंचावून आघाडीचा धर्म न पाळण्याचा निर्णय होऊन लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत माणच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते गोरे बंधू माढ्याच्या राजकारणातील मास्टर माईंडच ठरले आहेत.

दै. प्रभातच्या अंकात “माढ्याच्या राजकारणातील मास्टर माईंड बोराटवाडीत’ अशा आशयाची निवडणूक कालावधीत प्रसिद्ध झालेली बातमी तंतोतंत खरी ठरली. माणचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू परंतु तालुक्‍यातील राजकारणातील विरोधक असलेले शेखर गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळण्याचा निर्णय घेऊन भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. गोरे बधूंनी प्रचाराचे रान उठवत निंबाळकर यांच्या प्रचाराची धुराच ताब्यात घेतली.

विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा कॉग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले शेखर गोरे या दोघांनी हातात घेतल्याचे स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झालेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना माणमधून गोरे बंधुनी मताधिक्‍य दिले. मात्र, या निवडणुकीत माढ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून बऱ्याच घडामोडी घडल्या. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश करत निंबाळकर यांना पाठिंबा देऊन प्रतिष्ठा पणाला लावत माळशिरस तालुक्‍यातून निंबाळकर यांना तब्बल एक लाखाच्या वर मताधिक्‍य दिले आहे.

गेल्या निवडणुकीतही माण आणि माळशिरस तालुक्‍यानेच मोहिते पाटील यांना मताधिक्‍य देऊन तारले होते. याही निवडणुकीत माण आणि माळशिरस या दोन तालुक्‍यांनीच माढ्याचा खासदार ठरवला. फरक एवढाच की त्यावेळी गोरे बंधूंनी आघाडी धर्म पाळला. या निवडणुकीत आघाडी धर्माला तिलांजली देऊन निंबाळकर यांना मताधिक्‍य देत राष्ट्रवादीला सुरुंग लावला. हा सुरुंग पेरण्याचे काम पूर्वीचे राष्ट्रवादीचे नेते असलेल्या शेखर गोरे यांनी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या फलटण येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बंडाचे निशान फडकावून सुरू केले होते.

आमदार गोरे यांनी बोराटवाडीत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निंबाळकर यांना पाठिंबा दिला. माण तालुक्‍यातून तब्बल 23 हजार 215 एवढे मताधिक्‍य दिले. आमदार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात मोठा दबाव गट निर्माण केला. भाजपबरोबर जुळते घेण्याची शक्कल लढवत रणजितसिंहांना भाजपमध्ये पाठवून गोरेंनी आपला स्वत:चा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर केल्याचे राजकीय जाणकार सांगताहेत.

दुसरीकडे तालुक्‍यातील भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई हे दोन आमदारकिचे दावेदार असलेल्या नेत्यांवरही कडी केल्याचे बोलले जात आहे. त्यांचेच विरोधक बंधू शेखर गोरे यांनीही भाजप उमेदवाराला बाहेरून पाठिंबा दिल्याने त्यांच्याही भाजप प्रवेशात अडचणी आहेत त्यामुळे माण तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे एकमेव नेते संजयमामा शिंदे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होत. दुसरीकडे डॉ. येळगावकर, अनिल देसाई, आमदार गोरे, शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख यांच्यासह दिग्गज नेत मंडळी निंबाळकर यांचा प्रचार करत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच निंबाळकर यांचे पारडे जड होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथील रेकॉर्ड ब्रेक सभेमुळे भाजपला आणखी बळ मिळाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)