आ. गोरेंच्या उच्चाटनाचा एल्गार

वडूज येथील प्रभाकर देशमुखांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

वडूज – हुतात्म्यांच्या त्यागाला आणि या खटाव-माण तालुक्‍यांच्या नावलौकीकाला काळीमा फासणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या समुळ उच्चाटनाचा निर्धार अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या समर्थक नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी वडूज (ता. खटाव) येथे झालेल्या विराट प्रचार सांगता सभेत केला. सायंकाळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना खटाव माण तालुक्‍यांतील प्रत्येक गटातून प्रचंड मताधिक्‍क्‍य देण्याच्या पैजा लावत ऐतिहासिक विजयाचा निश्‍चयही यावेळी करण्यात आल्या.

खटाव माण सर्वपक्षीय विकास आघाडी व आमचं ठरलंयचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील बाजार चौकात विराट सभा झाली. व्यासपीठावर श्री. देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दादासाहेब गोडसे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, डॉ. संदीप पोळ, एम. के. भोसले, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, अनिल पवार, हिंदुराव गोडसे, मामूशेठ विरकर, डॉ. महेश गुरव, दिलीप तुपे, विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, रविंद्र सानप, सुनिल पोळ, सुनिल गोडसे, तानाजी देशमुख, डॉ. राजश्री देशमुख, श्रीमती शशिकला देशमुख, नकुसा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री. देशमुख यांची शहरातून पदयात्रा काढली.

त्यानंतर बाजार पटांगणात जाहीर सभा झाली. यावेळी मुसळधार पाऊस पडत असतानाही हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, उरमोडी, जिहे कठापूरचे पाणी येण्यासाठी आपणासह माजी आमदार कै. भाऊसाहेब गुदगे, आजी माजी सैनिक संघटना, निवृत्त अभियंता संघटना यांचे मोठे योगदान आहे. असे असताना आमदार गोरे आपण एकमेव या पाणी योजनेचे भगिरथ आहे, अशी वल्गना करून एकाच पाण्याचे पन्नासवेळा पूजन करून लोकांना फसवित आहेत.

प्रभाकर घार्गे म्हणाले, माण मतदार संघात विखाराचे राजकारण संपवून विचारांचे राजकारण आणण्यासाठी आम्ही सर्व मातब्बरांनी जाणीवपूर्वक प्रभाकर देशमुखांना समर्थन दिले आहे. सर्व विरोधक एकवटल्याने आ. गोरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते बेभान होऊन बेताल वक्तव्ये करीत आहेत, अशा कृत्यांमुळे त्यांचा पराभव अटळ आहे. रणजितसिंह देशमुख म्हणाले, आम्ही खानदानी शेतकरी आहोत.

संघर्षाच्या राजकारणाचे बाळकडू आम्हाला जन्मजातच मिळाले आहे. गोरे बंधूंचे सगळे काळे धंदे आम्हाला माहिती आहेत. अवैध धंदे, लांडी-लबाडीतून सुरूवात झालेल्या गोरे बंधूंनी आमची मापे काढू नयेत, त्यांनी स्वत:ची लायकी किती ते पहावे. खटाव माणच्या भूमीला चिकटलेले कुप्रवृत्तीचे हे बांडगूळ काढण्याची वेळ आली आहे. यावेळी डॉ. संदीप पोळ, मामूशेठ विरकर यांचीही जोरदार भाषणे झाली. पृथ्वीराज गोडसे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माजी सभापती संदीप मांडवे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक अभय देशमुख, विपूल गोडसे, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, विश्‍वास तुपे, नाना पुजारी, तानाजी बागल, प्रा. एस. पी. देशमुख, डॉ. प्रकाश पाटोळे, सागर पवार, विजय काळे, टी. के. देवकर, अक्षय थोरवे आदीसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.