सातारा – सातारा नगर पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याचा निर्णय घेत नागरिकांना नोटिसी बजावल्या होत्या. या अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या विरोधात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेऊन पालिका प्रशासनाच्या प्रक्रियेला जोरदार विरोध केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदरची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आक्रमक पावित्र्यापुढे पालिका प्रशासन नमले असून हरकतीवरील सुनावणी प्रशासनाने स्थगित केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून घरपट्टी वाढीचा मुद्दा गाजत आहे. सातारा नगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मिळकतधारांना पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबत नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. सदरची अन्यायकारक करवाढ होऊ नये, तसेच पालिकेची निवडणूक झाल्यांनतर समिती गठीत होऊन कर वाढीबाबत निर्णय होईल.
त्यामुळे सध्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदनही देण्यात आले होते. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदरची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली होती. याशिवाय प्रक्रिया स्थगित न झाल्यास आंदोलन करू, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पालिका प्रशासनाला दिला होता.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी करवाढ प्रक्रिया आणि याबाबतच्या हरकतींवर सुनावणी प्रक्रिया स्थगित करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर पालिका प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर वाढ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सातारकरांवरील करवाढीची टांगती तलवार दूर झाली आहे. सदरची प्रक्रिया रद्द करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारकरांच्यावतीने मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्यासह स्थगितीचा निर्णय घेणाऱ्या पालिका प्रशासनानेही आभार मानले आहेत. दरम्यान, काहीही झाले तरी अन्यायकारक घरपट्टी वाढ होऊ देणार नाही, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात नमूद केले आहेत.